
पुणे, दि. ९ जानेवारी :उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरू असताना, पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचाराची संपूर्ण धुरा खासदार सुनेत्रा पवार यांनी हाती घेतली आहे. आज जिजाऊ बंगला येथील निवासस्थानी त्यांनी पुणे महापालिका निवडणुकीत उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांच्या मॅरेथॉन बैठका घेतल्या.या बैठकीत पक्षाची संघटनात्मक तयारी, प्रभागनिहाय प्रचार रणनीती, बूथ व्यवस्थापन आणि मतदारांपर्यंत थेट पोहोचण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. खासदार सुनेत्रा पवार यांनी प्रत्येक उमेदवाराशी स्वतंत्र संवाद साधत, स्थानिक प्रश्न प्रभावीपणे मांडण्यावर आणि जनतेसमोर विकासकामांचे ठोस उदाहरण सादर करण्यावर विशेष भर दिला.राष्ट्रवादी काँग्रेस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दशकांत झालेल्या विकासकामांचा ठामपणे उल्लेख प्रचारात करावा, असे स्पष्ट मार्गदर्शन त्यांनी उमेदवारांना केले. संघटना तळागाळात अधिक मजबूत करण्याची, कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढवण्याची आणि प्रचारात एकसंध भूमिका ठेवण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.या बैठकीदरम्यान उमेदवारांनी आपल्या प्रभागातील निवडणूक परिस्थिती, बूथनिहाय कार्यकर्त्यांची तयारी तसेच प्रचार आराखड्यांचा आढावा सादर केला. सर्व उमेदवारांनी एकजुटीने निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त करत, राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय हा प्रत्येक कार्यकर्त्याचा संकल्प असल्याचे सांगितले.पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ नेतृत्वाकडून मिळणारे मार्गदर्शन आणि पाठबळ यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणूक मोहीम आता अधिक जोमाने पुढे जाणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.