कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत – सतेज पाटील

पुणे, दि. 9 : सध्या देशभर लोकशाही धोक्यात असून नागरिकांनी अशा लोकप्रतिनिधीची निवड करावी ज्यांच्या घरी किंवा कार्यालयात सामान्य माणूस निर्भयपणे जाऊ शकतो. त्यामुळे कॉंग्रेसला मत म्हणजे शांततेला मत असे स्पष्ट आवाहन माजी गृहराज्यमंत्री व काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केले.

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या वतीने प्रभाग क्रमांक २२ काशेवाडी–डायस प्लॉट येथील अधिकृत उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश रमेश बागवे, रफिक शेख व दिलशाद शेख यांच्या प्रचारासाठी आज हरकानगर, काशेवाडी येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ते बोलत होते.

पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले की, सध्याचे सरकार महापालिकेत सफाई कामाचे खाजगीकरण करण्याच्या विचारात असून यामुळे झाडूकामगारांचा वारसाहक्क संपुष्टात येण्याची तसेच त्यांचा घाणभत्ता बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला आणि कामगार वर्गाने काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी अविनाश बागवे यांनी सतेज पाटील यांचे स्वागत केले.
अध्यक्षीय भाषणात माजी मंत्री रमेश बागवे म्हणाले की, काशेवाडी व संपूर्ण परिसर हा काँग्रेस पक्षाचा वर्षानुवर्षांचा बालेकिल्ला असून या प्रभागातून काँग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या जाहीर सभेस माजी राज्यमंत्री रमेशदादा बागवे, ज्येष्ठ नेते चंद्रकांत चव्हाण, कविराज संघेलिया, विठ्ठल थोरात, यासेर बागवे, दयानंद अडागळे, रशीद खिजर, हुसेन शेख, राजू मोरे, मोहन माने, दिलीप कांबळे तसेच परिसरातील महिला, युवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button