दुचाकी–चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक क्रमांकांची अर्ज व लिलाव प्रक्रिया जाहीर

पुणे, दि. 9 : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ), पुणे येथे दुचाकी व चारचाकी वाहनांसाठी नवीन मालिकेतील आकर्षक व पसंतीच्या नोंदणी क्रमांकांसाठी अर्ज व लिलाव प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक वाहनधारकांना तीनपट व नियमित शुल्क भरून पसंतीचा क्रमांक आगाऊ अर्जाद्वारे राखून ठेवता येणार आहे.

चारचाकी वाहनांसाठी पसंतीच्या क्रमांकांचे अर्ज 9 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10.30 ते दुपारी 2.30 या वेळेत स्वीकारले जाणार आहेत. एखाद्या क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास संबंधित क्रमांकाचा लिलाव 12 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता घेण्यात येईल.

दुचाकी वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकांचे अर्ज 12 जानेवारी 2026 रोजी कार्यालयीन वेळेत स्वीकारले जातील. या क्रमांकांचा लिलाव 13 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4.00 वाजता सहकार सभागृहात होणार आहे.

लिलावासाठी जमा करण्यात येणारा डिमांड ड्राफ्ट (DD) हा “R.T.O., Pune” या नावाने नॅशनलाइज्ड अथवा शेड्युल्ड बँकेचा असावा व तो दोन महिन्यांपेक्षा जुना नसावा. चुकीची फी, चुकीचा डीडी किंवा अपूर्ण अर्ज आल्यास ते बाद करण्यात येतील. समान रकमेचे डीडी आल्यास चिठ्ठीद्वारे निर्णय घेतला जाणार आहे.

पसंतीच्या क्रमांकाची वैधता 180 दिवस राहील. लिलावानंतर उर्वरित क्रमांक ऑनलाईन प्रणालीद्वारे उपलब्ध होतील. पसंतीचा क्रमांक आरक्षित करण्यासाठी इच्छुकांनी https://fancy.parivahan.gov.in
या संकेतस्थळावर नोंदणी करून शुल्क भरावे, असे आवाहन आरटीओ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button