बजाज पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी सुरक्षिततेचे सूक्ष्म नियोजन करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी

पुणे, दि. ९ : ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम व संबंधित सर्व विभागांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. स्पर्धा मार्गावरील रस्ते स्वच्छ, सुरक्षित व अपघातमुक्त असावेत यासाठी सूक्ष्म नियोजन आवश्यक असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्ह्यात १९ ते २३ जानेवारी दरम्यान होणाऱ्या ‘बजाज पुणे ग्रँड टूर’ सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित सर्व विभागांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, स्पर्धेचे संचालक पिनाकी बैसाक तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले की, आरोग्य विभागाने स्पर्धा मार्गावर आवश्यक वैद्यकीय पथके तैनात ठेवावीत तसेच संबंधित ठिकाणांपासून २५ किलोमीटर परिसरातील सर्व सुविधा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांची माहिती तयार ठेवावी. स्पर्धा मार्गावरील रस्त्यांचे डीप क्लिनींग करावे आणि मार्गदर्शक व माहितीपर फलक तातडीने उभारावेत.

ग्रामीण भागात स्पर्धा मार्गावर जनावरे येणार नाहीत यासाठी पशुसंवर्धन विभाग, वनविभाग, ग्रामपंचायत व स्वयंसेवकांच्या माध्यमातून जनजागृती करावी. १२ व १८ जानेवारी रोजी स्पर्धेचे मॉकड्रिल घेण्यात येणार असून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व ग्रामीण पोलीस विभागाने समन्वयाने वाहतूक व मार्गनिश्चितीचे नियोजन करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबवावी तसेच गावागावांत स्पर्धकांचे स्वागत चांगल्या पद्धतीने होईल याचे नियोजन करावे. शिक्षण व क्रीडा विभागाने आवश्यक स्वयंसेवकांचा अंदाज घेऊन नियोजन करावे. अन्न व औषध प्रशासनाने स्पर्धा मार्गावरील खाद्यपदार्थांच्या दर्जाची तपासणी करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुरंदर, बारामती, पोलीस विभाग, आरोग्य, क्रीडा, वन, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडील तयारीचा आढावा घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button