
पुणे, : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कसबा मतदारसंघातील वरिष्ठ राजकीय व्यक्तिमत्त्व तसेच पीएमपीएमएलचे माजी अध्यक्ष सुधीर काळे यांनी आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, राजेश येनपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पर्वती ब्लॉक अध्यक्ष संतोष पाटोळे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
प्रवेशावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, “सुधीर काळे हे उशिरा भाजपमध्ये आले असले तरी त्यांनी पक्षात यावे, अशी आमची कायम इच्छा होती. निवडणूक अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना कोणतीही अपेक्षा न ठेवता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांचा दीर्घ राजकीय अनुभव आणि सर्वसमावेशक कामाची प्रतिमा भाजपसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.”
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “सुधीर काळे यांचे राजकारणातील योगदान लक्षात घेता त्यांचा पक्षात योग्य सन्मान राखला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला पुण्यातून मोठे बळ मिळेल. प्रभाग क्रमांक २७ मधील विजयात सुधीर काळे यांची भूमिका महत्त्वाची ठरेल.”
यावेळी सुधीर काळे म्हणाले, “आजपासून मी भाजपचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे. काँग्रेसमध्ये ज्या प्रामाणिकपणे काम केले, त्याच निष्ठेने भाजपमध्येही काम करेन. पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या कार्याने प्रेरित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला असून आगामी निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय राहणार आहे.”