अजित पवारांच्या सत्ताकाळात मेट्रो एक इंचही पुढे गेली नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : दिल्ली मेट्रोच्या धर्तीवर पुण्यात मेट्रो आणण्याची चर्चा २००१ पासून सुरू होती. मात्र २००१ ते २०१४ या कालावधीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्ताकाळात पुणे मेट्रोचे काम एक इंचही पुढे गेले नाही, अशी घणाघाती टीका केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली. मनमोहन सिंग पंतप्रधान आणि अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असतानाही मेट्रो केवळ चर्चेपुरतीच मर्यादित राहिली, असे ते म्हणाले.

अजित पवारांकडून मेट्रोचे श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू असून ही पुणेकरांची दिशाभूल आहे, असा आरोप करत मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर अजित पवारांचा विश्वास नाही का? असा सवालही उपस्थित केला.

गुरुवारी मोहोळ यांनी पुणे मेट्रोतून प्रवास करत प्रवाशांशी संवाद साधला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर कालपट मांडत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेवर बोट ठेवले.

सन १९८४ मधील कोलकाता मेट्रोनंतर देशात तब्बल १४ वर्षे मेट्रो प्रकल्पांना गती मिळाली नव्हती. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी दिल्ली मेट्रोला चालना दिली आणि त्याच धर्तीवर बेंगळुरू व पुण्यात मेट्रो आणण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, राज्य सरकार आणि पुणे व पिंपरी-चिंचवडमधील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सत्ताधाऱ्यांच्या दूरदृष्टीच्या अभावामुळे पुणे मेट्रो केवळ चर्चेतच अडकून राहिली, असे मोहोळ म्हणाले.

२००९ मध्ये ‘मेट्रो मॅन’ ई. श्रीधरन यांनी पुणे मेट्रोचा डीपीआर सादर केला. मात्र, निर्णयातील दिरंगाई, पालिकांमधील समन्वयाचा अभाव आणि निधी देण्यास झालेला नकार यामुळे प्रकल्प रखडत गेला. परिणामी मेट्रोचा खर्च आठ हजार कोटींवरून तब्बल दहा हजार १८३ कोटी रुपयांपर्यंत वाढला.

२०१४ नंतर केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतर पुणे मेट्रो प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमीपूजन झाले आणि ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रोचा पहिला टप्पा सुरू झाला.

आज ३१ किलोमीटर मेट्रोतून दररोज सुमारे दोन लाख पुणेकर प्रवास करत आहेत. “हे श्रेय भारतीय जनता पक्षाचेच आहे. खोटे बोलून पुणेकरांची दिशाभूल करण्यापेक्षा अजित पवारांनी मेट्रो प्रकल्पातील काँग्रेस-राष्ट्रवादीचा ठोस सहभाग दाखवावा,” असे आव्हान मोहोळ यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button