मुंबई मंथनमध्ये अनपेक्षित भेट; एकनाथ शिंदे–संजय राऊत आमनेसामने, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई, दि. ८ : मुंबईत एका खाजगी वृत्तवाहिनीच्या ‘मुंबई मंथन’ या कार्यक्रमादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांची अचानक भेट झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबईतील एका हॉटेलमध्ये आयोजित या कार्यक्रमात शिंदे यांची मुलाखत संपून ते बाहेर पडत असतानाच, संजय राऊत मुलाखतीसाठी स्टुडिओकडे जात होते. यावेळी दोघेही समोरासमोर आले.

एकमेकांना पाहताच दोन्ही नेत्यांनी थांबून अभिवादन केले. विशेष म्हणजे, एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. राऊत अलीकडेच आजारपणातून बरे झाले असून, या सौजन्यपूर्ण संवादाने उपस्थितांचे लक्ष वेधले. दोघांमध्ये साधारण एक ते दोन मिनिटे औपचारिक चर्चा झाली.

राजकीय मतभेद टोकाचे असतानाही या भेटीत कोणतीही कटुता दिसून आली नाही. या क्षणाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

विशेष म्हणजे, मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने तिचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. मात्र, ही भेट केवळ एका कार्यक्रमातील योगायोग असल्याचे सांगितले जात असले तरी, निवडणुकीच्या रणधुमाळीत कट्टर राजकीय विरोधकांमधील या सौजन्यपूर्ण संवादाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button