
पुणे, दि. ८ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, भाजप आमदार महेश लांडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आमोल मिटकरी यांनी अत्यंत आक्रमक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.
आमोल मिटकरी यांनी महेश लांडगे यांचे नाव न घेता टीका करताना म्हटले की, “आम्ही लांडग्यांच्या टीकेकडे लक्ष देत नाही.” त्यांनी शरद पवार यांची तुलना ‘सिंहा’शी तर अजित पवार यांची तुलना ‘वाघा’शी करत, पक्षातील नेतृत्व किती ताकदवान आहे हे अप्रत्यक्षपणे अधोरेखित केले.
मिटकरी पुढे म्हणाले की, अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत अनुभवी आणि मोठे नेते असून, त्यांच्यावर होणाऱ्या अशा क्षुल्लक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेला उत्तर देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला गरज वाटत नाही. “जनतेला काम महत्त्वाचे वाटते, आरडाओरड नव्हे,” असा टोला त्यांनी लगावला.
या वादाचे मूळ अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडमधील एका सभेत केलेल्या विधानात आहे. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी कोणाचेही नाव न घेता “भ्रष्टाचाराच्या ‘आका’ला संपवायचे आहे” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर भाजप आमदार महेश लांडगे यांनी पलटवार करत अजित पवार यांनाच “राज्यातील भ्रष्टाचाराचे आका” म्हणत गंभीर आरोप केले. तसेच, स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठीच अजित पवार भाजपसोबत सत्तेत आले असल्याचा दावा त्यांनी केला.
या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले असून, २०२६ मधील पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत हा वाद आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, या संघर्षाचा थेट परिणाम निवडणुकीच्या प्रचारावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.