
पुणे, दि. 8 : महिला बचत गट व तरुणांसाठी रोजगारनिर्मितीला चालना देण्यासाठी पुण्यात शिवसेना उद्योग भवन उभारण्यात येणार असून, त्यामार्फत बचतगटांसह तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाही शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथील अधिकृत उमेदवार आबा बागुल यांनी दिली.
प्रभाग क्रमांक ३६ मध्ये आबा बागुल यांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेक मतदारांनी त्यांच्या पहिल्या निवडणुकीच्या आठवणींना उजाळा देत आजही विश्वासाचं नातं कायम असल्याच्या भावना व्यक्त केल्या. सकाळी दुचाकी रॅली व पदयात्रेद्वारे आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी, नयना नितीन लगस या शिवसेनेच्या उमेदवारांनी मतदारांशी थेट संवाद साधला.
यावेळी माध्यमांशी बोलताना आबा बागुल म्हणाले की, महिला बचत गट व तरुणांच्या रोजगारासाठी ‘शिवसेना उद्योग भवन’ उभारण्यात येणार आहे. या उद्योग भवनाच्या माध्यमातून स्थानिक महिला बचत गट, तरुण उद्योजक व स्टार्टअपसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. उत्पादन, पॅकेजिंग, ब्रँडिंग व विक्रीसाठी आवश्यक सुविधा देण्यात येणार असून, कौशल्य विकास व रोजगाराभिमुख प्रशिक्षण कार्यक्रम राबविले जाणार आहेत.
तसेच उद्योगस्नेही कौशल्य प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यशाळा, आयटी, सेवा क्षेत्र, लघुउद्योग व गृहउद्योगांसाठी विशेष प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध रोजगार व स्वयंरोजगार योजनांची माहिती व प्रत्यक्ष लाभ, तसेच कर्ज, अनुदान, प्रशिक्षण व बाजारपेठ जोडणीसाठी मार्गदर्शन केंद्रही या उद्योग भवनात कार्यरत राहणार आहे.
महिलांचे सक्षमीकरण, तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आबा बागुल यांनी स्पष्ट केले.