पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची व लोकसहभागाची जोड देणारे समर्पित व्यक्तिमत्व हरपले – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, दि. ८ : ज्येष्ठ पर्यावरणतज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या निधनामुळे पर्यावरण संरक्षण चळवळीची मोठी हानी झाली असून, पर्यावरण संरक्षणाला विज्ञानाची आणि लोकसहभागाची प्रभावी जोड देणारे एक समर्पित व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकभावना व्यक्त करत डॉ. गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणाले की, विकास आणि पर्यावरण यांचा समतोल कसा साधावा याचा वस्तुपाठ डॉ. माधव गाडगीळ यांनी समाजाला दिला. निसर्ग हा केवळ पाहण्याची वस्तू नसून मानवी अस्तित्वाचा आधार आहे, ही त्यांची ठाम भूमिका होती. पर्यावरणविषयक सार्वजनिक धोरणांवर त्यांचा मोठा प्रभाव राहिला असून ते शाश्वत विकासाचे खंदे पुरस्कर्ते होते.

पश्चिम घाटाच्या संरक्षणासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. पारंपरिक ज्ञान प्रणाली आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड घालून पर्यावरण संरक्षणात स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग कसा मिळवता येईल, याचा आदर्श त्यांनी घालून दिला. “निसर्ग वाचवायचा असेल तर तिथल्या स्थानिक माणसाला सोबत घेतले पाहिजे,” हा त्यांचा ठाम आग्रह होता. जल, जंगल आणि जमीन यावर स्थानिक समुदायांचा अधिकार असावा, असे ते मानत.

खाणकाम, मोठी बांधकामे आणि हवामान बदल यांसारख्या गंभीर धोक्यांविरोधात निर्भीडपणे भूमिका मांडणारा एक महत्त्वाचा आवाज आपण गमावला आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. माधव गाडगीळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button