
पुणे दि. 8 : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ आणि जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ माधव गाडगीळ यांचे बुधवारी रात्री प्रदीर्घ आजारपणामुळे पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचे पुत्र सिद्धार्थ गाडगीळ यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील डॉ. शिरीष प्रयाग यांच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यान बुधवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
माधव गाडगीळ हे भारतातील अग्रगण्य पर्यावरण अभ्यासक मानले जात होते. पश्चिम घाट संवर्धन अहवाल, जैवविविधता संरक्षण, पर्यावरणीय धोरणे आणि शाश्वत विकास या क्षेत्रातील त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे होते. पर्यावरण रक्षणासाठी त्यांनी आयुष्यभर संशोधन, लेखन आणि जनजागृतीचे कार्य केले.
त्यांच्या जाण्याने देशातील पर्यावरण चळवळीला मोठी हानी झाली असून, विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त केला जात आहे.
आज संध्याकाळी ४ वाजता पुण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.