पणजीत ९ ते ११ जानेवारी दरम्यान २१ वे जागतिक मराठी संमेलन; ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेतून जागतिक मराठी एकत्र

पणजी, दि. ७ : जागतिक मराठी अकादमी व गोवा राज्य आयोजन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कला अकादमी, पणजी येथे दिनांक ९, १० व ११ जानेवारी २०२५ रोजी २१ वे जागतिक मराठी संमेलन आयोजित करण्यात आले आहे. ‘शोध मराठी मनाचा’ या संकल्पनेवर आधारित हे संमेलन पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, संमेलनाच्या सविस्तर कार्यक्रमाची माहिती आज जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, कार्याध्यक्ष उदयदादा लाड आणि कार्यकारणी सदस्य जयराज साळगावकर यांनी दिली.

संमेलनाची सुरुवात दि. ९ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता ‘चित्रपटातील मराठी माणूस’ या उद्घाटन सत्राने होणार असून, यामध्ये नामवंत अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याशी ब्रिटीश नंदी संवाद साधणार आहेत. त्यानंतर ‘लक्ष्मीची पावले’ या सत्रात उद्योग, व्यवसाय आणि जागतिक स्तरावर मराठी उद्योजकांचा प्रवास उलगडला जाणार आहे. सायंकाळी ‘चंद्रभागेच्या तीरावर’ हा नाथ संस्थान ओसा यांचा चक्री भजनाचा कार्यक्रम होईल.

सायंकाळी ५.३० वाजता संमेलनाचे भव्य उद्घाटन व पुरस्कार वितरण समारंभ होणार असून, उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. स्वागताध्यक्ष म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी महाराष्ट्राचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, गोव्याचे मंत्री दिगंबर कामत, रोहन खंवटे, सुदिन ढवळीकर आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.
याप्रसंगी महेश मांजरेकर यांना कला जीवन सन्मान तर अनिल खंवटे यांना जागतिक मराठी भूषण सन्मान प्रदान करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर ‘मर्मबंधातील ठे’ हा साभिनय नाट्यगीतांचा विशेष कार्यक्रम होईल.

दि. १० जानेवारी रोजी कवीसंमेलन, चित्रपट प्रवास, समुद्रापलीकडे सत्र, कृत्रिम बुद्धिमत्ता व सायबर सुरक्षा, पर्यटन व सांस्कृतिक बदल, माध्यमे व समाजमाध्यमे, मातृभाषा व जागतिकीकरण, तसेच चित्र–शिल्प–काव्य या बहुआयामी सत्रांद्वारे साहित्य, कला, तंत्रज्ञान आणि समाज यांचा सखोल विचारमंथन होणार आहे. रात्री ‘पालशेतची विहीर’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे.

दि. ११ जानेवारी रोजी सुर-संवाद, समुद्रातील सोने, जागतिक व्यवस्था व भारत, आधारवड आणि क्रीडांगण अशा सत्रांतून विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ अनुभव मांडणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता समारोप सोहळ्यात चित्रपटातील सामाजिक आशयावर नागराज मंजुळे यांची विशेष मुलाखत होणार आहे. समारोपास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, अॅड. रमाकांत खलप, श्रीपाद नाईक, सदानंद तानावडे यांची उपस्थिती लाभणार आहे.

हे संमेलन यशस्वी करण्यासाठी संमेलन कार्यवाह शिवकुमार लाड, गौरव फुटाणे, महेश म्हात्रे, तसेच गोवा आयोजन समितीचे अध्यक्ष दशरथ परब, सरचिटणीस प्रा. अनिल सामंत, कार्यवाह परेश प्रभू, डॉ. गौतम देसाई व कॅप्टन सावंत हे विशेष प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button