पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाला दोन दशकांची पूर्तता; जपानच्या ओकायामा शिष्टमंडळाची सदिच्छा भेट

पुणे महानगरपालिकेच्या स्व. पु.ल. देशपांडे उद्यान अर्थात पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या निर्मितीस दोन दशकांची पूर्तता झाल्याच्या निमित्ताने जपानच्या ओकायामा शहरातील शिष्टमंडळाने मंगळवार, दिनांक ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता उद्यानास सदिच्छा भेट दिली.हा कार्यक्रम पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल) मा. श्रीमती पवनीत कौर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ओकायामा जपानचे शिष्टमंडळ, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपानचे प्रतिनिधी तसेच पुणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उद्यानामध्ये केक कापून पुणे–ओकायामा मैत्री उद्यानाच्या द्वीदशकपूर्तीचा आनंद साजरा करण्यात आला. भारत–जपान मैत्रीचे प्रतीक असलेल्या या उद्यानाने गेल्या २० वर्षांत पुणेकरांना निसर्गसौंदर्य, जपानी संस्कृतीची अनुभूती आणि शांततेचे वातावरण दिले असल्याचे यावेळी मान्यवरांनी नमूद केले.यानंतर पुणे महानगरपालिकेचे मा. महापालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. नवल किशोर राम यांच्या दालनात ओकायामा शिष्टमंडळातील सर्व प्रतिनिधींचे स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले.या वेळी मा. श्रीमती पवनीत कौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त (जनरल), मा. श्री. ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष), श्रीमती योगिता भोसले, नगर सचिव, डॉ. अशोक घोरपडे, सह महापालिका आयुक्त तसेच श्री. समीर खळे, अध्यक्ष, असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जपान उपस्थित होते.पुणे–ओकायामा शहरांमधील मैत्री, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वाचा ठरल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button