पुण्यासाठी १,००० ई-बस, मेट्रोचा १५० किमीपर्यंत विस्तार; भाजपच्या संकल्पपत्रात विकासाचा रोडमॅप

पुणे, दि 7 : पुणेकर हे विकासाला सदैव पाठिंबा देणारे असून पुणे शहर अधिक विकसित, स्वच्छ आणि आधुनिक बनविण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यासाठी मांडलेली दूरदृष्टीपूर्ण ‘ब्ल्यू प्रिंट’ प्रत्यक्षात आणण्यासाठी भाजप सातत्याने प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा जाहीरनामा “विकसित पुण्यासाठी संकल्पपत्र” केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रसिद्ध करण्यात आला. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, आमदार भीमराव तापकीर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी आमदार जगदीश मुळीक, रविंद्र साळेगावकर, विश्वास ननावरे आदी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले की, पुणे हे देशातील एक महत्त्वाचे आणि सर्वसमावेशक शहर म्हणून विकसित होत आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बाणेर–बालेवाडी भागाचा समावेश करून तेथे मोठ्या प्रमाणावर विकास करण्यात आला आहे. मागील पाच वर्षांत महापालिकेत भाजपला काम करण्याची संधी पुणेकरांनी दिली असून दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला आहे. पुणेकरांना जुना कारभारी नको आहे, हे त्यांनी २०१७ च्या निवडणुकीत स्पष्टपणे दाखवून दिले आहे, असेही ते म्हणाले.

पुण्यात सध्या ३२ किमी मेट्रो सेवा सुरू असून आगामी काळात ती १५० किमीपर्यंत विस्तारित करण्याचे उद्दिष्ट आहे. गेल्या तीन वर्षांत साडेदहा कोटीहून अधिक प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी १,००० ई-बसना मंजुरी देण्यात आली असून भविष्यात साडेचार हजार ई-बस शहरात धावतील. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन सुरक्षित आणि पर्यावरणपूरक प्रवास उपलब्ध होणार आहे.

पुणे विमानतळाच्या विस्ताराला प्राधान्य देण्यात येत असून ४४ किमी नदीकाठ सुधार प्रकल्प वेगाने सुरू आहे. सांस्कृतिक राजधानी म्हणून पुण्याचा वारसा जपतानाच आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचेही मोहोळ यांनी नमूद केले.

दरम्यान, भाजपच्या संकल्पपत्रात सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, करदाते, आरोग्य, वाहतूक, गृहनिर्माण तसेच सांस्कृतिक व आर्थिक विकास या घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. पुणे शहराला ‘वर्ल्ड बुक कॅपिटल’ बनविणे, अत्याधुनिक कन्व्हेन्शन सेंटर उभारणे, ‘एम्स’ रुग्णालय आणणे, नवीन मेट्रो मार्ग, डेटा सेंटर विकास यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांचा संकल्पपत्रात समावेश आहे. पुणेकर पुन्हा एकदा भाजपवर विश्वास ठेवतील, असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button