नवीन वर्षात मुक्ता बर्वेची खास भेट; ‘माया’ची पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड

पुणे, दि. 7  मराठी चित्रपटसृष्टीत आशयघन आणि प्रयोगशील सिनेमांची परंपरा अधिक बळकट होत असताना, महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री मुक्ता बर्वे नव्या वर्षाची सुरुवात एका खास चित्रपटाच्या माध्यमातून करत आहे. नेहमीच दमदार आणि वेगळ्या भूमिका साकारणारी मुक्ता बर्वे आता ‘माया’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स यांच्या निर्मितीत तयार झालेल्या या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, येत्या २७ फेब्रुवारीला ‘माया’ चित्रपटगृहात दाखल होणार आहे.

‘माया’ या चित्रपटात मुक्ता बर्वे प्रमुख आणि प्रभावी भूमिकेत झळकणार आहे. पोस्टरमध्ये तिच्यासोबत सिद्धार्थ चांदेकर, रोहिणी हट्टंगडी आणि डॉ. गिरीश ओक यांची तगडी कलाकारांची फळी दिसून येते. चित्रपटाच्या पोस्टरमधूनच वेगळ्या आशयाची झलक मिळत असून, नेमकी कथा काय असेल याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अधिकृत घोषणेआधीच ‘माया’ने आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली आहे. या चित्रपटाची निवड २४ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (PIFF) मध्ये झाली असून, त्यामुळे ‘माया’च्या दर्जेदार कथानकावर शिक्कामोर्तब झाले आहे. चित्रपटाची घोषणा आणि महोत्सवातील निवड एकाच वेळी समोर आल्याने ‘माया’ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले,

“‘बिन लग्नाची गोष्ट’च्या यशस्वी अनुभवानंतर ‘माया’ घेऊन येत आहे. पोस्टरला मिळालेला प्रतिसाद आणि पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये निवड होणे आमच्यासाठी अत्यंत समाधानकारक आहे. लवकरच प्रेक्षक हा चित्रपट अनुभवतील.”

निर्माते डॉ. सुनील दातार म्हणाले,

“‘माया’ हा चित्रपट आमच्यासाठी खूप खास आहे. दमदार कलाकार आणि वेगळा आशय असलेली ही कथा प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, असा मला विश्वास आहे.”

शालिनी सिनेमाज आणि नितीन वैद्य प्रॉडक्शन्स निर्मित ‘माया’चे दिग्दर्शन आदित्य इंगळे यांनी केले असून, डॉ. सुनील दातार, अलका मधुकर दातार आणि नितीन प्रकाश वैद्य यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ‘माया’ हा चित्रपट येत्या २७ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button