
पुणे, दि. ६ जानेवारी २०२६ : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत स्वयंसहाय्यता समूहांना (SHG) बँकांमार्फत सुलभ आणि प्रभावी कर्जपुरवठा व्हावा, यासाठी पुणे जिल्हा परिषद येथे जिल्हास्तरीय अनिवासी बँक व्यवस्थापक प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या प्रशिक्षण कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध बँक शाखांमधील एकूण १९३ बँक व्यवस्थापकांनी सहभाग घेतला. उमेद अभियानांतर्गत महिलांच्या यशोगाथा, ‘लखपती दिदी’ंचे प्रेरणादायी मनोगत, बीसी सखींचे अनुभव आणि माहितीपर चित्रफिती सादर करून बँकर्सना प्रत्यक्ष क्षेत्रातील सकारात्मक परिणामांची ओळख करून देण्यात आली.
कार्यशाळेत लखपती दिदी, लघुउद्योजक महिला, शेती व बिगर शेतीवर आधारित उपक्रम, तसेच राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून महिलांना कर्जपुरवठा करताना आवश्यक असलेली कार्यवाही, अनुत्पादक मत्ता (एनपीए) विषयक बाबी आणि कर्ज पुनर्भरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. याशिवाय बँकर्सच्या ऑनलाईन रिपोर्टिंग संदर्भातील शंका-समाधानावरही सकारात्मक संवाद साधण्यात आला.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ऑनलाईन उपस्थित राहून मार्गदर्शन केले. प्रशिक्षण सत्रात राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था (एनआयआरडी), हैदराबाद येथील तज्ज्ञ श्रीनिवास राव व श्रीमती शेफाली सिंह यांनी स्वयंसहाय्यता समूह बँक कर्ज, वैयक्तिक कर्ज, डिजिटल फायनान्स, सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक साक्षरता या विषयांवर सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमास प्रकल्प संचालक श्रीमती शालिनी कडू, जिल्हा अग्रणी बँकेचे एलडीएम योगेश पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देसाई यांनी उपस्थित बँकर्सना मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषद पुणे येथील अधिकारी-कर्मचारी, सर्व जिल्हा व तालुका व्यवस्थापक आणि बँक व्यवस्थापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.