‘बजाज पुणे ग्रँड टूर’ मार्गावर व्यापक स्वच्छता मोहिम राबवावी – जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

पुणे, दि. 7 : ‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’ ही आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा पुणे जिल्ह्यातून होत असून स्पर्धेचा संपूर्ण मार्ग व त्यावरील गावे देश-विदेशात थेट दूरचित्रवाहिनीद्वारे दाखवली जाणार आहेत. त्यामुळे या मार्गावर संपूर्ण स्वच्छता राखण्यासाठी प्रशासनाने स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सुक्ष्म नियोजन करावे. प्रशासन, लोकप्रतिनिधी, नागरिक, गृहनिर्माण सोसायट्या, गणेश मंडळे, महाविद्यालये, राष्ट्रीय छात्र सेना (NCC) व राष्ट्रीय सेवा योजना (NSS) यांच्यासह मोहिमस्तरावर स्वच्छता अभियान राबवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले.

‘बजाज पुणे ग्रँड टूर–२०२६’च्या टप्पा क्रमांक दोनच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी आज संपूर्ण स्पर्धा मार्गाची गावनिहाय पाहणी करत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आमदार शंकर मांडेकर, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने, पुरंदरच्या वर्षा लांडगे, भोर-वेल्हाचे विकास खरात, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर, कार्यकारी अभियंता अनुराधा भंडारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, तहसीलदार अर्चना निकम, विक्रम राजपूत, श्रीनिवास ढाणे तसेच ‘बजाज पुणे ग्रँड टूर’चे तांत्रिक सल्लागार पिनाकी बायसक आदी उपस्थित होते.

पुरंदर, भोर, वेल्हा व हवेली तालुक्यातील विविध गावांमध्ये बैठक घेत जिल्हाधिकाऱ्यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, शैक्षणिक संस्थांचे प्रमुख व मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले.

जिल्हाधिकारी डूडी म्हणाले, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्यातील नैसर्गिक सौंदर्य, पर्यटनस्थळे व शिवकालीन इतिहास जगभर पोहोचणार आहे. खेळाडूंच्या स्वागतासाठी स्वयंशिस्त पाळत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास, लोककला, पथनाट्य व लोकनाट्य सादर करावे. मात्र स्पर्धेला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मार्गावर पाळीव प्राणी येणार नाहीत याची विशेष काळजी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही स्पर्धा केवळ महाराष्ट्राची नव्हे तर देशातील सर्वात मोठ्या स्पर्धांपैकी एक असून याच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याचा नवा इतिहास जगासमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आमदार शंकर मांडेकर म्हणाले, ‘बजाज पुणे ग्रँड टूर’मुळे जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळणार असून प्रशासन अहोरात्र परिश्रम घेत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे.

लेडीज क्लब येथून पाहणी दौऱ्यास सुरुवात करून नांदेड सिटी येथे दौऱ्याचा समारोप करण्यात आला. यावेळी विविध गावांमध्ये जिल्हाधिकारी व आमदारांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी सायकल स्पर्धेच्या विषयावर काढलेल्या चित्रांद्वारे केलेले स्वागत विशेष लक्षवेधी ठरले.

स्पर्धेचा टप्पा क्रमांक २ मार्ग:

लेडीज क्लब (कॅम्प) – गोळीबार चौक – कोंढवा – येवलेवाडी – भिवरी – चांबळी – कोडीत – नारायणपूर – चिव्हेवाडी – केतकावळे – कापूरव्होळ – कासुर्डी – मोहरी – जांबळी – आंबवणे – करंजावणे – वांगणी – निघडे – कुसगाव – खेड शिवापूर – कोंढणपूर – सिंहगड घाट रोड – डोणजे – किरकिटवाडी – खडकवासला – नांदेड सिटी (सिंहगड रोड).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button