“ड्रायव्हर एकता दिखायेगा! इलेक्शन में सबक सिखायेगा!!” – परिवहन विभागाविरोधात रिक्षा व कॅब चालकांचा राज्यव्यापी उघड निषेध

पुणे, दि. 7 : राज्यभरातील रिक्षा व कॅब चालकांनी परिवहन विभागाच्या धोरणांविरोधात उघड निषेध सुरू केला असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये परिवहन मंत्र्यांना धडा शिकवण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला आहे.
“ड्रायव्हर एकता दिखायेगा! इलेक्शन में सबक सिखायेगा!!” असा ठळक संदेश असलेले पोस्टर्स रिक्षा व कॅब वाहनांवर लावून चालकांनी आपला रोष लोकशाही मार्गाने जनतेपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे.

हा निषेध कोणत्याही एका शहरापुरता मर्यादित नसून, संपूर्ण महाराष्ट्रभर रिक्षा व कॅब चालकांमध्ये तीव्र असंतोष पसरलेला असल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे. परिवहन विभागाच्या चुकीच्या धोरणांमुळे, भ्रष्टाचारामुळे तसेच चालकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सातत्याने दुर्लक्ष केल्यामुळे चालकांचे जीवनमान मोठ्या अडचणीत सापडले आहे.

पॅनिक बटन, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस (VLTD), परवाने, अवाजवी दंडात्मक कारवाया, अंमलबजावणीतील दुजाभाव तसेच चालकांच्या सुरक्षिततेकडे झालेल्या दुर्लक्षामुळे चालकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

यासोबतच ओला, उबेर, रॅपिडो यांसारख्या कॅब अ‍ॅग्रीगेटर कंपन्यांच्या ॲप्लिकेशन्समधून सरकारमान्य दर चालकांना मिळत नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. दरनियमनाचा अभाव, जादा कमिशन कपात, अचानक अकाउंट ब्लॉक करणे, प्रभावी तक्रार निवारण यंत्रणेचा अभाव आणि अन्यायकारक अटी यामुळे चालकांची आर्थिक कोंडी होत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे. या खासगी ॲप्लिकेशन्सवर शासनाचा ठोस आणि प्रभावी अंकुश नसल्याने चालकांमध्ये असंतोष वाढत आहे.

रिक्षा व कॅब चालकांच्या उपजीविकेशी संबंधित या ॲप्लिकेशन्ससाठी स्वतंत्र फॅब्रिकेटर/अ‍ॅग्रीगेटर धोरण तातडीने लागू करावे, तसेच गिग कामगारांसाठी कल्याणकारी मंडळ तत्काळ कार्यान्वित करावे, अशी ठाम मागणी चालक संघटनांकडून करण्यात येत आहे.

विशेषतः पुणे शहरात मोठ्या प्रमाणावर रिक्षा व कॅब वाहनांवर हे निषेधात्मक पोस्टर्स लावलेले दिसून येत असून, ही चळवळ आता वेगाने विस्तारत आहे. चालक संघटना, असंघटित कामगार आणि गिग वर्कर्स एकत्र येत असून, “मत हेच आमचे शस्त्र आहे” असा स्पष्ट संदेश शासनाला दिला जात आहे.

जर रिक्षा व कॅब चालकांच्या मूलभूत प्रश्नांकडे तातडीने गांभीर्याने लक्ष दिले गेले नाही, तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचे राजकीय परिणाम स्पष्टपणे दिसून येतील, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button