पुण्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून देणारे लोकनेते सुरेश कलमाडी यांचे निधन, पुणेकरांच्या मनाला चटका

पुणे : पुण्याचे नाव आंतरराष्ट्रीय कला, क्रीडा, उद्योग आणि पर्यटन नकाशावर ठळकपणे अधोरेखित करणारे दूरदृष्टीचे लोकनेते, माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे निधन पुणेकरांच्या मनाला चटका लावून गेले आहे. पुण्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, त्यांच्या जाण्याने शहराने एक अनुभवी नेतृत्व गमावले आहे.

पुणे फेस्टिव्हल, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF) आणि पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन यांसारखे उपक्रम त्यांनी केवळ सुरूच केले नाहीत, तर ते आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवले. हे सर्व उपक्रम आजही सातत्याने आणि यशस्वीपणे सुरू आहेत, हे त्यांच्या सक्षम नेतृत्वाचे आणि दूरदृष्टीचे जिवंत उदाहरण आहे.

‘उपक्रम सुरू करणे सोपे असते, मात्र ते चालवणे अवघड असते,’ असे ते नेहमी सांगत असत. मात्र या उक्तीला त्यांनी स्वतःच्या कार्यातून खरा अर्थ दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व उपक्रम दीर्घकाळ अखंडपणे चालू राहिले, याचे संपूर्ण श्रेय सुरेश कलमाडी यांनाच द्यावे लागेल.

पुणे फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष म्हणून काम करताना त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे, प्रशासन कौशल्याचे आणि मार्गदर्शक सूचनांचे लाभ सतत मिळाले. पुणे शहराचा विकास ज्या भव्यतेने आणि व्यापक दृष्टिकोनातून त्यांनी साधला, त्याबद्दल सारे पुणेकर निश्चितच कायम कृतज्ञ राहतील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button