प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या विकासावर केलेल्या विधानांना महसूलमंत्री तथा भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. पुणे शहराचा गेल्या काही वर्षांत मोठा कायापालट झाला असून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अभूतपूर्व विकास झाला आहे. हे वास्तव अजित पवार खासगीतही मान्य करतील, असा दावा बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपच्या काळात राबविण्यात आलेल्या विकास योजनांची सविस्तर यादी आपण अजित पवार यांना पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. भाजपचे नाव घेऊन टीका करण्याचे कर्तृत्व अजित पवार यांनी दाखवू नये, असा टोला त्यांनी लगावला.

यावेळी भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि भाजपचे माजी गटनेते गणेश बीडकर उपस्थित होते. बावनकुळे म्हणाले की, महाराष्ट्र मंत्रिमंडळासमोर २०४७ पर्यंतचा ‘विकसित महाराष्ट्र’ आराखडा मंजुरीसाठी असून त्याअंतर्गत विकसित पुण्यासाठी दीर्घकालीन नियोजन करण्यात आले आहे.

या आराखड्यात पुणे शहराला केंद्रस्थानी ठेवून मेट्रो जाळ्याचे विस्तारीकरण, पर्यावरणपूरक सुविधा, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, समान पाणीपुरवठा, रस्ते विकास, नदी सुधार प्रकल्प, पुरंदर विमानतळ विकास, भूमिगत सांडपाणी व्यवस्था, झोपडपट्टी पुनर्वसन, स्मार्ट शाळा, समाविष्ट गावांचा विकास, गुंठेवारी नियम सुलभीकरण, अनधिकृत बांधकामे अधिकृत करणे आणि प्रत्येक घराचे मॅपिंग अशा विविध योजनांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

विधानसभा व नगरपरिषद निवडणुकांत जनतेने भाजपला भरघोस पाठिंबा दिला असून आगामी महापालिका निवडणुकीतही भाजपला ५१ टक्क्यांहून अधिक मते मिळतील, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला. “विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास” हे समीकरण जनतेच्या मनात पक्के झाले असल्याचेही ते म्हणाले.

सन २०१७ पूर्वीचा पुणे आणि आजचा पुणे यातील बदल गुगलवरही दिसून येईल, असा टोला लगावत महायुतीतील सात सदस्यांची समन्वय समिती कार्यरत असून मित्रपक्षांमध्ये वाद निर्माण होतील अशी विधाने कोणीही करणार नाही, असे ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. जलसिंचन, मुंढवा जमीन घोटाळा तसेच इतर प्रकरणांबाबत चौकशी सुरू असून सत्य लवकरच समोर येईल, असा दावाही त्यांनी केला.

दरम्यान, वॉर्ड क्रमांक २४ मधील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे सरचिटणीस अमर कोरे, उपाध्यक्ष वनिता जगताप आणि आयेशा अमर कोरे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये पक्षप्रवेश केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button