
पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल या प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपाची ताकद आणखी वाढली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील प्रमुख नेत्यांनी आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला.
हा प्रवेश राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपचे निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या उपस्थितीत पार पडला. या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला प्रभागात मोठा राजकीय धक्का बसला असून, भाजपासाठी पोषक वातावरण अधिकच मजबूत झाले आहे.
अलीकडेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून प्रभागातील राजकीय समीकरणे बदलली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेत्यांच्या प्रवेशामुळे भाजपाचा विजयमार्ग अधिक सुकर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या उपाध्यक्ष वनिता विश्वास जगताप, सरचिटणीस अमर सुभाष कोरे आणि सदस्य आयेशा अमर कोरे यांचा समावेश आहे. त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्त्यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
वनिता विश्वास जगताप या प्रभागात सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. अमर सुभाष कोरे आणि आयेशा अमर कोरे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यांच्या पक्षांतरामुळे राष्ट्रवादीच्या संघटनात्मक रचनेला खिंडार पडले असून, भाजप उमेदवार गणेश बिडकर यांच्या विजयाला मोठे बळ मिळाले आहे.
गणेश बिडकर यांनी प्रभागात राबवलेल्या विकासकामांमुळे नागरिकांचा विश्वास वाढला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलमध्ये सुविधा वृद्धी, तसेच ‘लाईट हाऊस’ प्रकल्पातून महिलांना रोजगाराच्या संधी देण्यासारख्या उपक्रमांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास झाला आहे.
“विकासाभिमुख नेतृत्व आणि सातत्याने केलेली कामे पाहूनच आम्ही राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केला,” अशी भावना प्रवेशावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक २४ मध्ये भाजपाचा गड अधिक भक्कम झाल्याचे स्पष्ट होत असून, येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपाची बाजू अधिक मजबूत झाली आहे.