
पुणे : पुण्याचे माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे शहराच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजप नेते ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी आज कोथरुड येथील सुरेश कलमाडी यांच्या निवासस्थानी भेट देऊन अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली.
यावेळी बोलताना ना. चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, “पुण्याच्या सामाजिक आणि सार्वजनिक जडणघडणीत सुरेश कलमाडी यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहिले आहे. ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून त्यांनी शहराच्या सांस्कृतिक वैभवाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. तसेच बालेवाडी क्रीडा संकुलाच्या उभारणीतून क्रीडा क्षेत्रासाठी भरीव योगदान दिले. त्यांच्या निधनाने सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीतील दूरदर्शी व्यक्तिमत्व हरपले आहे.”
दरम्यान, भारतीय जनता पक्ष पुणे शहराच्या वतीने शहर कार्यालयातही माजी खासदार सुरेश कलमाडी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भाजप प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.