पुणे शहराला सर्वोत्तम करण्यासाठी भाजपशिवाय पर्याय नाही – केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे : भारतीय जनता पक्ष हा केवळ निवडणुकीपुरता नव्हे तर वर्षभर २४ तास लोकांसाठी काम करणारा पक्ष आहे. पुणे शहराला देशातील सर्वोत्तम शहर बनवायचे असेल तर भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाशिवाय पर्याय नाही, असे ठाम मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री व पुणे शहराचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) यांच्या संयुक्त उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ आज बोपोडीचे ग्रामदैवत भैरवनाथा यांचे दर्शन घेऊन करण्यात आला. यावेळी मुरलीधर मोहोळ बोलत होते. याप्रसंगी शिवाजीनगर मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे, भाजप व आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोहोळ पुढे म्हणाले, पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची अवस्था बिकट असून त्यांना निवडणुकीसाठी उमेदवारही सापडत नाहीत. भाजपने मागील पाच वर्षांत महापालिकेत विकासकामांचा भक्कम पाया घातला आहे. आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे कार्य, केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या योजनांमुळे आज घरोघरी सरकारी योजनांचा लाभ पोहोचला आहे. भाजपला केवळ सत्ता नको, तर जनतेची प्रामाणिक सेवा करायची आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी प्रभाग ८ मधील भाजप–आरपीआयचे उमेदवार सनी विनायक निम्हण, परशुराम वाडेकर, भक्ती अजित गायकवाड आणि सपना आनंद छाजेड यांचा परिचय करून देण्यात आला.

उमेदवार सनी निम्हण म्हणाले, स्वर्गीय मंत्री चंद्रकांत छाजेड साहेबांचा सर्वसमावेशक विचार आणि स्वर्गीय आमदार विनायक निम्हण साहेबांची काम करण्याची धमक घेऊन आम्ही चारही उमेदवार प्रभागाचा समतोल व सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहोत. अन्न, वस्त्र, निवाऱ्याबरोबरच शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजांवर भर देत बोपोडी परिसरात दर्जेदार आरोग्य सुविधा, ट्रॉमा केअर सेंटर, तसेच ई-लर्निंग शाळा सुरू करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन विकास करण्याचा आमचा निर्धार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, राज्यात आणि देशात डबल इंजिन सरकार कार्यरत आहे. पुणे शहरातही भाजपला बहुमत दिल्यास ट्रिपल इंजिन सरकार तयार होईल आणि पुणे शहर विकासाच्या सुपरफास्ट मार्गावर जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button