
पुणे दि. ६ : कुरळे ब्रदर्ससाठी आयुष्य म्हणजे नियम, शिस्त आणि एकच ठाम तत्त्व – ‘नो लेडीज, नो मॅरेज’. स्त्रियांपासून चार हात लांब राहणाऱ्या या भावांच्या आयुष्यात जर एका बिनधास्त स्त्रीची एंट्री झाली, तर काय होणार? हाच मजेशीर गोंधळ प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या आगामी मराठी चित्रपटात.
नुकताच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये रतन, मदन, चंदन आणि बबन या कुरळे ब्रदर्सच्या आयुष्यात कामिनीची एंट्री होते आणि त्यांच्या ठरवून ठेवलेल्या नियमांना जबरदस्त धक्का बसतो. कामिनीच्या आगमनामुळे होणारी तारांबळ, गोंधळ आणि विनोदाची धमाल झलक टीझरमध्ये पाहायला मिळते.
या चित्रपटात कामिनीची भूमिका अभिनेत्री रिंकू राजगुरू साकारत आहे. शिस्तप्रिय आणि नियमबद्ध भावंडांमध्ये तिची बिनधास्त एंट्री म्हणजे डबल गोंधळ आणि डबल विनोद. कठोर स्वभावाचा रतन, विनोदी मदन, निरागस चंदन आणि खट्याळ बबन यांच्यासोबत कामिनीची केमिस्ट्री कशी रंगते, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच स्पष्ट होणार आहे.
या भूमिकेबद्दल रिंकू राजगुरू म्हणते,
“‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’सारख्या लोकप्रिय चित्रपटाच्या सीक्वेलचा भाग होणं माझ्यासाठी खूप खास आहे. अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांसोबत तसेच दिग्दर्शक अंकुश चौधरी यांच्यासोबत काम करताना खूप काही शिकायला मिळालं.”
सुशीलकुमार अग्रवाल आणि अल्ट्रा मीडिया ॲण्ड एंटरटेनमेंट प्रस्तुत, उषा काकडे प्रॉडक्शन्स, ईओडी. मीडिया उदाहरणार्थ निर्मित आणि अमेय विनोद खोपकर पिक्चर्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अंकुश चौधरी यांनी केले आहे.
चित्रपटाचे निर्माते उषा काकडे, पुष्कर यावलकर, सुधीर कोलते, स्वाती खोपकर आणि निनाद नंदकुमार बत्तीन असून सहनिर्माते मोहसिन खान, यशराज टिळेकर, सौरभ ललवाणी आणि धनविक एंटरटेनमेंट आहेत.
अंकुश चौधरी यांची कथा, संदीप दंडवते यांची पटकथा व संवाद लाभलेल्या या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू, संकेत पाठक, संजय नार्वेकर आणि समृद्धी केळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
छायाचित्रण प्रसिद्ध छायाचित्रकार संजय जाधव यांनी केले आहे.
हा धमाल विनोदी चित्रपट ३० जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.