क्रांतिज्योती’ची पोरं महाराष्ट्रभर सुपरहिट! पहिल्याच वीकेंडला ३.९१ कोटींची घवघवीत कमाई

पुणे दि. ६ : मराठी शाळेच्या अस्मितेला प्रभावी आवाज देणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, पहिल्याच वीकेंडला चित्रपटाने तब्बल ३.९१ कोटी रुपयांची बंपर कमाई केली आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासून अनेक शहरांमध्ये चित्रपटगृहांमध्ये हाऊसफुल फलक झळकत असून, मराठी शाळेच्या आठवणींमध्ये हरवलेले प्रेक्षक भावनिक होत चित्रपटगृहातून बाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशयघन कथा, वास्तववादी संवाद, भावनिक क्षण आणि प्रभावी मांडणी यामुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे.

सोशल मीडियावर तसेच बुक माय शोसारख्या प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट सातत्याने ट्रेंडिंगमध्ये आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रेक्षकांनी या चित्रपटावर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

चित्रपटाची ताकदवान कथा, कलाकारांची नैसर्गिक अभिनयशैली, मनाला भिडणारे संगीत आणि प्रत्येक फ्रेममधून जाणवणारी मराठी मातीची ओढ यामुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ हा चित्रपट केवळ सिनेमा न राहता एक भावनिक अनुभव ठरत आहे. समीक्षकांनीही चित्रपटाचे भरभरून कौतुक केले असून, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून चित्रपटाला दाद दिली आहे.

या यशाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले,
“प्रेक्षकांचे प्रेम पाहून मी अक्षरशः भारावून गेलो आहे. हा विषय संवेदनशील होता, पण प्रेक्षकांनी तो मनापासून स्वीकारला, याचे खूप समाधान वाटते. हा प्रतिसाद मला अधिक प्रामाणिक चित्रपट घेऊन येण्याची प्रेरणा देतो.”

या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोग या चित्रपटाच्या निर्माती आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button