
पुणे दि. ६ : माजी केंद्रीय मंत्री तसेच पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते सुरेश कलमाडी यांच्या निधनाने पुणे शहराच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अनुभवी आणि दूरदृष्टी असलेले ज्येष्ठ नेतृत्व हरपले असल्याची भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी आपल्या शोकसंदेशातून माजी खासदार सुरेश कलमाडी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशात सांगितले की, भारतीय हवाई दलात पायलट म्हणून कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या सुरेश कलमाडी यांनी पुढे राजकारणात प्रवेश करत पुणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचे योगदान दिले. पुण्याचे खासदार, केंद्रीय मंत्री तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रभावी कार्य केले.
‘पुणे फेस्टिव्हल’ आणि ‘पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन’ यांसारख्या उपक्रमांमुळे पुणे शहराला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वेगळी ओळख मिळाली. सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या निधनाने शहराने एक अनुभवी, अभ्यासू आणि मार्गदर्शक नेतृत्व गमावले आहे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला.