
पुणे, दि. 5 : स्वयं पुनर्विकासाच्या माध्यमातून प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला ‘आहे तिथे हक्काचे घर’ कायदेशीररित्या मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असा ठाम निर्धार शिवसेनेचे अधिकृत उमेदवार व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी व्यक्त केला. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रभागासह संपूर्ण पुणे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची आणि झोपडपट्टीवासीयांचे हित जोपासण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथील शाहू वसाहत येथे आयोजित प्रचार सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आबा बागुल यांच्यासह पॅनलमधील तीनही उमेदवार उपस्थित होते. सभेत नागरिकांनी एसआरए योजनेतील अनागोंदी, विलंब आणि अन्यायकारक कारभाराबाबत आपली व्यथा मांडली.
त्यावर बोलताना आबा बागुल म्हणाले, “आज झोपडपट्टीवासीय एसआरए योजनेतील अनागोंदीमुळे प्रचंड त्रस्त आहेत. मूठभर विकसकांच्या फायद्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडूनच झोपडपट्टीवासीयांना वेठीस धरले जात आहे. दडपशाहीच्या जोरावर गरिबांचे हक्काचे छत हिरावून घेण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे अशा एसआरए योजनेला माझा तीव्र विरोध आहे.”
शाहू वसाहत, दाते बस स्टॉप, तावरे कॉलनी, ५४/२ अण्णाभाऊ साठे वसाहत, संजयनगर, पद्मावती वसाहत आदी प्रभागातील प्रत्येक झोपडीधारकाचे जीवनमान उंचावणे हे माझ्यासाठी केवळ योजना नसून माझा शब्द आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
“शिवसेनेचे धोरण स्पष्ट आहे—कोणत्याही झोपडपट्टीवासीयाचा हक्क हिरावला जाणार नाही. त्यामुळे स्वयं पुनर्विकासातून प्रत्येक पात्र झोपडपट्टीवासीयाला साडेसहाशे (६५०) चौरस फूटाचे ‘आहे तिथे’ घर देण्यात येईल,” अशी ग्वाही आबा बागुल यांनी यावेळी दिली.