वकील बनून सत्यासाठी लढणार राजसी भावे; ‘केस नं. ७३’मधील तडफदार भूमिकेची उत्सुकता

पुणे दि. 5:   विविध मराठी चित्रपट आणि रंगभूमीवरून आपल्या अभिनयाची छाप उमटवणारी युवा अभिनेत्री राजसी भावे आता एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आगामी मराठी चित्रपट ‘केस नं. ७३’ मध्ये ती एका प्रामाणिक, निर्भीड आणि तत्वनिष्ठ क्रिमिनल वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून, सत्यासाठीचा तिचा हा लढा प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा ठरणार आहे.

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना राजसी भावे सांगते,
“मधुरा इनामदार ही अतिशय प्रामाणिक आणि ठाम मतांची वकील आहे. तिच्या प्रवेशानंतर ‘केस नं. ७३’ मधील गुंता कसा उलगडतो, हे पाहणं नक्कीच रंजक ठरेल. सातत्याने घडणाऱ्या हत्यांचं सत्रनाट्य जेव्हा कोर्टापर्यंत पोहोचतं, तेव्हा एक तडफदार वकील म्हणून सत्य उघड करताना माझ्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू प्रेक्षकांना पाहायला मिळतील.”

वकिलांची देहबोली, त्यांची विचारसरणी आणि व्यक्तिमत्व यांचे बारकाईने निरीक्षण करून ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न केल्याचे राजसीने नमूद केले. त्यामुळे ही भूमिका तिच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

लायलॅक मोशन पिक्चर्स आणि डस्क स्टुडिओज यांच्या निर्मितीखाली तयार झालेला ‘केस नं. ७३’ हा मराठी चित्रपट जानेवारी महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी शर्वरी सतीश वटक आणि डॉ. मिलिंद मुक्तेश्वर आपटे यांनी सांभाळली आहे. सहनिर्माते म्हणून प्रविण अरुण खंगार यांचे योगदान आहे.

चित्रपटात अशोक शिंदे, राजसी भावे, शैलेश दातार, नंदिता पाटकर, पियुष आपटे अशी दमदार स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. पटकथा डॉ. ऋचा अमित येनुरकर यांची असून, गीतलेखन मंदार चोळकर यांनी केले आहे. संगीत व पार्श्वसंगीताची धुरा अमेय मोहन कडू यांनी सांभाळली असून, छायांकन निनाद गोसावी यांचे आहे.

न्याय, सत्य आणि थरार यांचा संगम असलेला ‘केस नं. ७३’ प्रेक्षकांसाठी एक वेगळा सिनेमॅटिक अनुभव ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button