
पुणे दि. 5: वस्तीभागातील तरुण मुला-मुलींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून त्यांना स्वावलंबी करण्यासाठी पुणे भाजपचे निवडणूक प्रमुख व प्रभाग २४ ‘ड’ चे उमेदवार गणेश बिडकर यांनी राबवलेला ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ हा उपक्रम आज हजारो तरुणांसाठी आशेचा किरण ठरत आहे. शिक्षणाअभावी रोजगाराच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या तरुणांच्या कला-कौशल्यांना योग्य दिशा देत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू आहे.
वस्तीभागातील अनेक तरुण-तरुणींना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही. मात्र शिक्षण नसले तरी त्यांच्यात विविध कला, कौशल्ये आणि मेहनतीची जिद्द असते. हीच बाब लक्षात घेऊन, तरुणांच्या कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात व आत्मविश्वास मिळावा, या उद्देशाने गणेश बिडकर यांनी सन २०२१ मध्ये सोमवार पेठेतील भोलागिरी येथील महानगरपालिकेच्या शाळेत ‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’ची सुरुवात केली.
या उपक्रमाचा लाभ कसबा पेठ, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, नाना पेठ, गणेश पेठ आदी वस्तीभागांतील तरुणांना मोठ्या प्रमाणात झाला आहे. १८ ते ३० वयोगटातील तरुण-तरुणींना एक महिन्याचे सघन व व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामुळे तरुणांना स्वतःच्या करिअरविषयक स्वप्नांना आकार देता येत असून, स्वतःसह कुटुंबासाठीही उपजीविकेचे भक्कम साधन निर्माण होत आहे.
२०२१ ते २०२५ या कालावधीत १५००हून अधिक तरुण-तरुणींनी या प्रकल्पांतर्गत प्रशिक्षण घेतले असून, त्यापैकी ५५० पेक्षा अधिक तरुणांना प्रत्यक्ष नोकऱ्या मिळाल्या आहेत. हे आकडेच या प्रकल्पाच्या यशाची सशक्त साक्ष देणारे ठरत आहेत.
लाईट हाऊस प्रोजेक्टअंतर्गत प्रशिक्षण देण्यापूर्वी इच्छुक तरुण-तरुणींची करिअर टेस्ट घेतली जाते. त्यांच्या आवडी, क्षमता, गुणवत्ता आणि व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास करून त्यानुसार योग्य क्षेत्रातील प्रशिक्षण दिले जाते.
या प्रकल्पामध्ये टॅली, कॉम्प्युटर ऑपरेटर, टेलरिंग, ब्युटी पार्लर, हेल्थ सेक्टर, जिम इन्स्ट्रक्टर, नर्सिंग असिस्टंट, कुकिंग, ग्राफिक डिझाईन, विविध सॉफ्टवेअर लँग्वेजेस अशा अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते.
या उच्च दर्जाच्या आणि गरजाधिष्ठित प्रशिक्षणामुळे वस्तीभागातील अनेक तरुणांचे जीवनमान उंचावले आहे. विशेष म्हणजे, या उपक्रमामुळे अनेक तरुण गुन्हेगारी किंवा चुकीच्या मार्गाकडे वळण्यापासून वाचले असून, आज ते आत्मविश्वासाने स्वतःचे करिअर घडवत उज्ज्वल भविष्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
‘लाईट हाऊस प्रोजेक्ट’च्या माध्यमातून समाजातील दुर्लक्षित घटकांमध्ये आशेचा प्रकाश निर्माण करत, समाजघडणीचे भक्कम कार्य गणेश बिडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.