
पुणे, दि. 5: पुणे महापालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या नेत्या आणि उमेदवार रुपाली ठोंबरे पाटील यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. भाजप नेत्यांनी अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर आरोप करण्यापूर्वी “आधी स्वतःच्या गिरेबानात डोकावून पाहावे,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठोंबरे पाटील म्हणाल्या की, भाजपने विनाकारण टीका केली नसती तर प्रत्युत्तर देण्याची वेळच आली नसती. निवडणुकीच्या काळात मुद्दाम समाजात वाद निर्माण करणे, तेढ वाढवणे आणि सत्तेचा गैरवापर करणे ही भाजपची जुनी कार्यपद्धती असल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकीट दिले असून, त्यामुळे त्यांची दुहेरी भूमिका उघड होत असल्याचे ठोंबरे पाटील यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या चार दशकांपासून राज्याच्या विकासासाठी आणि कायदा-सुव्यवस्थेसाठी ठोस व धाडसी निर्णय घेतले असून, त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
दरम्यान, रुपाली ठोंबरे पाटील या स्वतः पुणे महापालिका निवडणुकीसाठी रिंगणात उतरल्या असून, पक्षाकडून त्यांना प्रभाग क्रमांक २ आणि २६ मधून उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढत अपेक्षित असून, राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.