बीडमध्ये रील स्टार गणेश डोंगरेचा भीषण अपघातात मृत्यू; ट्रॅक्टर ट्रॉली अंगावर उलटून जागीच निधन

पुणे, दि. 5:  बीड जिल्ह्यातील सोशल मीडिया विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली असून, Instagram वर रील्समुळे लोकप्रिय असलेला रील स्टार गणेश डोंगरे याचा ट्रॅक्टर अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पाटोदा तालुक्यातील डोंगरकिन्ही परिसरात हा भीषण अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेश डोंगरे हा आपल्या ट्रॅक्टरमधून ऊस वाहतूक करत होता. याच दरम्यान ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॉली अचानक उलटली आणि ती थेट गणेश डोंगरेच्या अंगावर पडली. या गंभीर अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला.

गणेश डोंगरे हा सोशल मीडियावर, विशेषतः Instagram Reels वर आपल्या विनोदी, ग्रामीण जीवनावर आधारित व्हिडिओंमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होता. अल्पावधीतच त्याने हजारो चाहत्यांची फळी निर्माण केली होती.

त्याच्या आकस्मिक निधनामुळे बीड जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात असून, सोशल मीडियावर शोकसंदेशांचा अक्षरशः पूर आला आहे. चाहत्यांसह मित्रपरिवार आणि ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. एका सामान्य कुटुंबातील तरुणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख निर्माण केली होती; मात्र काळाने त्याच्यावर घाला घातला, अशी भावना व्यक्त होत आहे.

या घटनेमुळे शेती कामादरम्यान होणाऱ्या अपघातांबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button