
पुणे, दि. 5: प्रभाग क्रमांक ९ येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित विजयी संकल्प सभा प्रचंड उत्साहात पार पडली. या सभेला कार्यकर्ते, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी उपस्थिती लाभली. संपूर्ण सभास्थळावर जोशपूर्ण वातावरण होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल रतन बालवडकर यांच्या भावनिक आणि आक्रमक भाषणाने सभेला वेगळीच धार मिळाली. गेली अकरा वर्षे तन-मन-धन अर्पण करून पक्षवाढीसाठी काम करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांवर झालेल्या अन्यायाचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला. शेवटच्या क्षणी उमेदवारी नाकारून कार्यकर्त्याला संपवण्याचा प्रयत्न म्हणजे राजकीय हत्या असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
उमेदवारी नाकारल्यानंतर “घरी कसे जायचे, आई-वडिलांना काय सांगायचे?” असा प्रश्न निर्माण झाल्याचे सांगत त्यांनी त्या काळातील मानसिक संघर्ष सभेसमोर मांडला. मात्र त्याच निर्णायक क्षणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोन आला आणि संपूर्ण परिस्थिती बदलली, असे बालवडकर म्हणाले.
“अजितदादांनी माझ्यावर अन्याय झाल्याचे मान्य केले आणि चर्चेसाठी बोलावले. त्या एका भेटीत मला राजकीय पुनर्जन्म मिळाला,” असे त्यांनी स्पष्ट केले. आजही कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहणारे नेतृत्व म्हणजे अजित पवार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे महानगरपालिकेच्या कारभारावर जोरदार टीका केली. वाहतूक कोंडी, अपूर्ण रस्ते, खड्डे, कचरा व्यवस्थापनाचा अभाव, अनियमित पाणीपुरवठा आणि वाढते प्रदूषण यामुळे पुणेकर त्रस्त असल्याचे त्यांनी सांगितले. आरोग्य आणि शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचे मूलभूत हक्क असून, त्यासाठी सक्षम व जबाबदार कारभाराची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
प्रभाग क्रमांक ९ मधील उमेदवार गायत्री मोहन मेढे, बाबुराव दत्तोबा चांदेरे, पार्वती अजय निम्हण आणि अमोल रतन बालवडकर यांच्या कार्याचे कौतुक करत, या सर्वांनी प्रभागातील सामाजिक, नागरी आणि विकासात्मक प्रश्नांसाठी सातत्याने काम केल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परिवर्तनासाठी या उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
विजयी संकल्प सभेमुळे प्रभाग क्रमांक ९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अधिक बळकट झाल्याचे स्पष्ट झाले. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, येणाऱ्या निवडणुकीत घड्याळ चिन्हावर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.