ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या तातडीने सोडवणार – शिवसेना उमेदवार आबा बागुल यांची ग्वाही

पुणे, दि. 5: तळजाई टेकडी येथील सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम तसेच वाळवेकर लॉन येथे आयोजित संवाद कार्यक्रमात शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आणि माजी उपमहापौर आबा बागुल यांनी ज्येष्ठ नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी आणि अपेक्षा जाणून घेतल्या. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह पॅनलमधील बाळासाहेब उर्फ मच्छिन्द्र ढवळे, पूनम हरीश परदेशी आणि नयना नितीन लगस यांनी तळजाई टेकडीवर सकाळी फिरायला येणाऱ्या नागरिकांशी संवाद साधला. यावेळी “विकासासाठी शिवसेनेचे धोरण कणखर आहे” यावर चर्चा करण्यात आली. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना आबा बागुल म्हणाले की, आयुष्याचा मोठा काळ समाज, कुटुंब आणि शहराच्या जडणघडणीसाठी वाहिलेल्या ज्येष्ठांचा सन्मान राखणे आणि त्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणे ही आपली नैतिक व सामाजिक जबाबदारी आहे.
या संवादात ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्य सुविधा, नियमित वैद्यकीय तपासणी, औषधोपचार, विरंगुळ्यासाठी मोकळ्या जागा, सुरक्षित चालण्याचे मार्ग, स्वच्छतागृहे, सार्वजनिक बस थांबे तसेच प्रशासनाशी संबंधित कामांमध्ये येणाऱ्या अडचणींबाबत आपली मते मांडली. अनेकांनी एकटेपणा, मानसिक तणाव आणि संवादाच्या अभावाचा मुद्दाही उपस्थित केला.
यावर प्रतिक्रिया देताना आबा बागुल यांनी स्पष्ट केले की, “ज्येष्ठ नागरिक म्हणजे समाजाचा अनुभवसंपन्न आधारस्तंभ आहेत. त्यांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या तातडीने सोडवण्यासाठी ठोस उपाययोजना राबवण्यात येतील. ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र हेल्पडेस्क, नियमित आरोग्य शिबिरे, विरंगुळा केंद्रे उभारणे तसेच आवश्यक त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यात येईल.”

तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांच्या दैनंदिन जीवनात सुलभता आणण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना प्राधान्याने राबवण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. “समाजाचा विकास हा सर्व घटकांना सोबत घेऊनच होतो. ज्येष्ठ नागरिक सुखी, सुरक्षित आणि सन्मानाने जगतील, यासाठी मी कटिबद्ध आहे,” असे आबा बागुल यांनी सांगितले.
या कार्यक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत असून, थेट व्यासपीठ मिळाल्याने अनेकांनी आबा बागुल यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button