
पुणे : सिंधुताई सपकाळ या केवळ व्यक्ती नव्हत्या, तर त्या करुणेचा अखंड झरा होत्या. स्वतः सेवेत कार्यरत राहून त्यांनी अनेकांच्या कार्यालाही दिशा आणि ऊर्जा दिली. समाजसेवेत काम करत असताना लोकांशी मदत मागण्याची ताकद त्यांनी दिली आणि त्यामुळेच माझा प्रवास इथपर्यंत पोहोचला. सिंधुताईंचे कार्य हे वटवृक्षांसारखे असून त्याच्या खोलवर रुजलेल्या मुळांनी समाजाला आधार दिला आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभूणे यांनी केले.
बालगंधर्व रंगमंदिर येथे ‘माई परिवार’ तर्फे सिंधुताई सपकाळ यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पद्मश्री डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यशोदा माई राष्ट्रीय पुरस्कार – २०२६’ प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे यंदा चौथे वर्ष असून, सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ कार्य करणाऱ्या रेणुताई गावस्कर (अध्यक्षा – एकलव्य बाल शिक्षण व आरोग्य न्यास, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) आणि सेवा संकल्प प्रतिष्ठान (चिखली, जि. बुलढाणा) यांना हा सन्मान देण्यात आला.
या वेळी विलू पूनावाला फाऊंडेशनचे सीईओ जसविंदर नारंग, नंदकुमार व आरती पालवे, कल्याणी ग्रुपचे आनंद चिंचोळकर, ममता सिंधुताई सपकाळ, दीपक गायकवाड, विनय सपकाळ, मनीष बोपटे यांच्यासह माई परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सिंधुताईंचा खडतर पण प्रेरणादायी जीवनप्रवास लहान मुलांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने माई पब्लिकेशन्स तर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘चिंधीची गोष्ट’ या विशेष बालकथासंग्रहाचे प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना प्रभूणे म्हणाले, एखादे झाड जसे कोवळ्या मुळांनी खडक फोडून खोलवर रुजते आणि वरून भव्य दिसते, तसेच सिंधुताईंचे कार्य आहे. त्यांच्या कन्या ममता यांच्यातही माईंचे सर्व गुण उतरले असून त्यांच्यातील करुणेचा झरा आजही समाजासाठी वाहतो आहे. माता यशोदेप्रमाणे समाजसेवेच्या रणांगणात लढणाऱ्यांना माईंच्या नावाचा पुरस्कार दिला जातो, ही आनंदाची बाब आहे.
सत्काराला उत्तर देताना रेणुताई गावस्कर म्हणाल्या, वाचनातून समाज समजतो आणि मुलांकडूनही खूप काही शिकायला मिळते. अर्थपूर्ण शिक्षणाशिवाय खरी राष्ट्रनिर्मिती शक्य नाही. माझ्या कामातून दहा मुलांचे जीवन जरी घडले, तरी ते राष्ट्रनिर्मितीचे योगदान आहे.
नंदकुमार पालवे यांनी सांगितले की, माईंच्या नावाचा पुरस्कार मिळणे म्हणजे पद्मश्री मिळाल्यासारखेच आहे. हा सन्मान आम्हा सर्व सहकाऱ्यांना समर्पित आहे. बेवारस व विस्मृतीत गेलेल्या व्यक्तींच्या सेवेतून चार रुग्णांपासून सुरू झालेला प्रवास आज साडेतीनशेपर्यंत पोहोचला असून हा पुरस्कार नवी ऊर्जा देणारा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ममता सिंधुताई सपकाळ यांनी केले. आनंद चिंचोळकर यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन क्षिप्रा मानकर (अमरावती) यांनी केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ज्येष्ठ बासरीवादक अमर ओक आणि सुप्रसिद्ध कवी वैभव जोशी यांच्या ‘ऋतु बरवा’ या शब्द-सुरांच्या विशेष कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली.