
पुणे, दि. 5: पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस अधिक तापत चालले आहे. प्रभाग क्रमांक ९ मध्ये आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेपूर्वी अचानक उभ्या राहिलेल्या बॅनर्समुळे मोठी खळबळ उडाली आहे.
अज्ञात मतदारांनी थेट अजित पवारांनाच उद्देशून लावलेल्या या बॅनर्सवर “हाच का दादांचा वादा?” असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. तसेच “अवैध धंदे करणारे आणि जमिनी लाटणाऱ्यांचा प्रचार तुम्ही करणार का?” असा थेट आणि जहरी प्रश्न विचारण्यात आला आहे.
या बॅनर्समुळे प्रभागात राजकीय चर्चांना उधाण आले असून, नागरिकांमध्येही कुतूहल निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हे बॅनर्स कोणी लावले याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी, त्यामागील राजकीय हेतूंबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत.
अजित पवार यांच्या आजच्या सभेत या बॅनरबाजीवर ते काय भूमिका मांडतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीत अशा प्रकारच्या बॅनरबाजीमुळे प्रचार अधिक आक्रमक होण्याची चिन्हे दिसून येत आहेत.