
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २२ मधील कासेवाडी डायस प्लॉट वसाहतीत अखिल भारतीय काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मित्रपक्षांच्या अधिकृत उमेदवारांचे घरोघरी उत्साहात स्वागत करण्यात आले.
काँग्रेस–शिवसेना (ठाकरे) आघाडीचे उमेदवार इंदिरा अविनाश बागवे, अविनाश बागवे, रफिक शेख आणि दिलशाद शेख यांनी वसाहतीतील प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. शिक्षण, पाणीपुरवठा, रस्ते व स्वच्छता या मूलभूत प्रश्नांना आगामी काळात प्राधान्याने सोडविण्याचे आश्वासन उमेदवारांकडून देण्यात आले.
उमेदवार रस्त्यावर प्रचार न करता थेट घरोघरी भेट देत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. विशेषतः महिलांनी औक्षण करत उमेदवारांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
डायस प्लॉट ही जुनी वसाहत असून येथे दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे माजी नगरसेवक व उमेदवार अविनाश बागवे यांनी सांगितले. तसेच येथील नागरिकांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पदयात्रेत विठ्ठल थोरात, यासर बागवे, दयानंद अडागळे, शिलार रत्नागिरी, धरम कांबळे, महेबुब नदाफ, युनूस शेख, शिवाजी भोसले, बाबा सरोदे, सुभाष दुबळे, सचिन घोलप यांच्यासह डायस प्लॉट वसाहतीतील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.