‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी कुटुंबातूनच सुरुवात आवश्यक; संवाद, संस्कार आणि सक्षमीकरणावर भर – मोहन भागवत

पुणे दि. 4 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांना आळा घालण्यासाठी कौटुंबिक संवाद, संस्कार आणि सामाजिक सतर्कता या बाबींवर भर देण्याचे आवाहन केले आहे. जानेवारी २०२६ मध्ये भोपाळ येथे आयोजित ‘स्त्री शक्ती संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते.

भागवत म्हणाले की, अशा घटनांना रोखण्यासाठी सर्वात आधी प्रयत्न घरातून आणि कुटुंबातूनच सुरू झाले पाहिजेत. कुटुंबात मुला-मुलींशी नियमित आणि खुले संवाद नसल्यामुळे बाहेरील व्यक्तींचा प्रभाव त्यांच्यावर सहजपणे पडतो. त्यामुळे पालकांनी केवळ शैक्षणिक प्रगतीकडेच नव्हे, तर मुलांच्या मानसिक व भावनिक आरोग्याकडेही विशेष लक्ष दिले पाहिजे.

ते पुढे म्हणाले की, संस्कार आणि मूल्यांची पायाभरणी लहानपणापासून झाली, तर मुले आपल्या मुळांशी जोडलेली राहतात आणि कोणत्याही बाह्य आकर्षणांना बळी पडत नाहीत. हिंदू धर्म, संस्कृती आणि परंपरांची योग्य ओळख मुलांना करून देणे ही कुटुंबाची जबाबदारी आहे.

मोहन भागवत यांनी मुलींच्या सक्षमीकरणावर विशेष भर देत सांगितले की, मुलींमध्ये जागरूकता निर्माण करणे, आत्मरक्षणाचे शिक्षण देणे आणि आत्मविश्वास वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्या कोणत्याही फसव्या जाळ्यात अडकणार नाहीत.

यासोबतच त्यांनी त्रिस्तरीय दृष्टीकोन (Three-tier approach) मांडला.
यामध्ये –

कुटुंबात सातत्यपूर्ण संवाद,

मुलींमध्ये जागरूकता व आत्मरक्षणाची भावना,

अशा गुन्ह्यांमध्ये सहभागी असणाऱ्यांविरुद्ध कठोर आणि निर्णायक कारवाई,
यांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भागवत यांनी असेही नमूद केले की, केवळ कुटुंबच नव्हे तर सामाजिक संस्था आणि समाजानेही सतर्क राहून सामूहिकपणे प्रतिसाद देणे गरजेचे आहे. मुले घरच्या संस्कारांपासून दूर गेली कीच अशी संकटे ओढवतात, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button