डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीमला पुन्हा ४० दिवसांचा पॅरोल; २०१७ नंतर १५ व्यांदा तुरुंगाबाहेर

पुणे दि. 4 :  रोहतक (हरियाणा) : डेरा सच्चा सौदा प्रमुख आणि बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषी ठरलेला गुरमीत राम रहीम सिंग याला पुन्हा एकदा ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. ४ जानेवारी २०२६ रोजी ही माहिती समोर आली असून, २०१७ मध्ये शिक्षा झाल्यानंतर ही त्याची १५ वी सुटका आहे. विशेष म्हणजे २०२६ या वर्षातील ही त्याची पहिलीच सुटका ठरली आहे.

सध्या राम रहीम हा हरियाणातील रोहतक येथील सुनारिया तुरुंगात शिक्षा भोगत आहे. पॅरोल मंजूर झाल्यानंतर तो तुरुंगातून बाहेर पडणार असून, या काळात तो उत्तर प्रदेशातील बागपत येथील बरनावा आश्रमात किंवा हरियाणातील शिरसा येथील डेरा सच्चा सौदा आश्रमात वास्तव्यास राहण्याची शक्यता आहे.

राम रहीमवर दोन साध्वींवरील बलात्कार प्रकरणात २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली असून, पत्रकार रामचंद्र छत्रपती हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा तो भोगत आहे. गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरूनही त्याला वारंवार पॅरोल व फरलो मिळत असल्याने समाजातील विविध घटकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम रहीमला मिळालेल्या या पॅरोलमुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यामागे राजकीय हितसंबंध असल्याचा आरोप केला असून, निवडणूक काळात अशा निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button