
पुणे दि. 4 : ‘बिग बॉस मराठी ३’चा उपविजेता आणि अभिनेता जय दुधाणे याला ठाणे पोलिसांनी ४ जानेवारी २०२६ रोजी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतले आहे. सुमारे ५ कोटी रुपयांच्या आर्थिक फसवणुकीच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक तपासात जय दुधाणेने बनावट कागदपत्रांच्या आधारे काही दुकाने बेकायदेशीरपणे विकल्याचा तसेच जिम व्यवसायाच्या नावाखाली गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात केवळ जयच नव्हे तर त्याच्या आई, बहीण तसेच आजी-आजोबांचाही सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे, जय दुधाणेचे २४ डिसेंबर २०२५ रोजी हर्षला पाटीलसोबत लग्न झाले होते. लग्नाला अवघे १० ते ११ दिवस उलटले असतानाच आणि हनिमूनला जाण्याच्या तयारीत असताना त्याला विमानतळावरून ताब्यात घेण्यात आल्याने मनोरंजन विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, जय अलीकडेच ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मराठी मालिकेत झळकत होता. मात्र काही कारणास्तव त्याने ही मालिका अचानक सोडली होती. आता या निर्णयामागेही हे प्रकरण कारणीभूत होते का, याबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत.
सध्या ठाणे पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत असून, पुढील चौकशीनंतर अधिक माहिती उघड होण्याची शक्यता आहे.