
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत मध्य प्रदेशमध्ये करण्यात आलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आणि संविधानिक मूल्यांच्या रक्षणासाठी वंचित बहुजन आघाडी, भारतीय बौद्ध महासभा आणि समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले.
या महामोर्चात आंबेडकरवादी, संविधानप्रेमी नागरिकांचा प्रचंड जनसागर उसळला होता. “मनुवाद मुर्दाबाद”, “संविधान जिंदाबाद” अशा घोषणांनी संपूर्ण सीएसटी परिसर दुमदुमून गेला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार असून त्यांच्या विरोधातील कोणतेही अवमानकारक वक्तव्य सहन केले जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
संविधान वाचवण्याची जबाबदारी केवळ आंबेडकरवाद्यांची नसून ती संपूर्ण देशातील नागरिकांची आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. आरएसएस आणि मनुवादी संघटनांकडून सातत्याने बाबासाहेबांचा अवमान केला जात असून समाजात द्वेष पसरवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अशा संघटनांवर तात्काळ बंदी घालावी, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली.
शोषित, वंचित आणि पीडित समाजावर होणारे अन्याय-अत्याचार यापुढे सहन केले जाणार नाहीत. भाजपने देशात लोकशाहीचा तमाशा चालवला असून महाराष्ट्राला मणिपूरसारख्या स्थितीकडे नेण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप यावेळी कार्यकर्त्यांनी केला.
हा लढा कोणत्याही एका जातीसाठी नसून देश, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी आहे. देशहितासाठी आणि लोकशाही टिकवण्यासाठी हा संघर्ष सुरूच राहील, असा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मध्य प्रदेश सरकार तसेच केंद्र सरकारचा जाहीर निषेध करण्यात येत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाची विटंबना करणाऱ्या आरोपींवर त्वरित कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
या महामोर्चात वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष सागर गवई, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.