
पुणे, दि. 3 : वारजे माळवाडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. हाडांच्या गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकलीचा तिच्याच आईने दोरीने गळा आवळून खून केला. त्यानंतर संबंधित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
मृत चिमुकलीचे नाव शारवी आदिनाथ देवडकर (वय २ वर्षे ३ महिने) असून तिची आई छाया आदिनाथ देवडकर (वय २८) हिचाही या घटनेत मृत्यू झाला आहे. ही घटना वारजे माळवाडीतील गोकुळनगर पठार परिसरातील कारगिल फार्म हाऊसजवळ घडल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी महिलेचे पती आदिनाथ संताराम देवडकर (वय ३०) यांनी वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, शारवी ही जन्मापासूनच हाडांच्या गंभीर आजाराने त्रस्त होती. उपचारांचा खर्च, मानसिक तणाव आणि भविष्यातील चिंतेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी छाया देवडकर हिच्याविरोधात मुलीचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येमागील नेमके कारण आणि घटनेचे सर्व पैलू तपासण्यासाठी वारजे माळवाडी पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू आहे.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, आई–लेकीच्या दुर्दैवी मृत्यूने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.