
पुणे, दि. 3 : पुणे महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या प्रचारादरम्यान हडपसर परिसरातील प्रभाग क्रमांक ४१ मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या प्रभागातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असलेले उमेदवार सादिक उर्फ बाबू कपूर यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे संपूर्ण पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, निवडणूक प्रचारादरम्यान वाढलेल्या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कपूर हे सक्रियपणे प्रचारात सहभागी होते आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर ही घटना घडल्याने चर्चांना अधिकच उधाण आले आहे.
दरम्यान, सादिक कपूर यांच्या कुटुंबियांनी गंभीर आरोप केले असून, निवडणूक प्रचाराच्या काळात प्रतिस्पर्धी राजकीय गटातील काही व्यक्तींनी त्यांचा सातत्याने छळ केला. त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. या कथित छळामुळेच त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणाची दखल घेत पुणे पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब, उपलब्ध पुरावे तसेच प्रत्यक्षदर्शींची माहिती संकलित करण्यात येत असून, सर्व बाबींची सखोल चौकशी केली जात आहे.
१५ जानेवारी २०२६ रोजी पुणे महानगरपालिकेसाठी मतदान होणार असून, या पार्श्वभूमीवर घडलेल्या या घटनेमुळे निवडणूक प्रक्रियेतील सुरक्षितता, उमेदवारांवरील दबाव आणि प्रचारातील राजकीय वातावरणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.