
पुणे दि. ३ : पुणे शहरातील गंभीर प्रश्नांवर उपाययोजना करण्याऐवजी भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत केवळ प्रचारकी ‘नुरा कुस्ती’ करत आहेत, अशी घणाघाती टीका आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी केली आहे. पुणेकरांच्या समस्या या कोंबड्यांच्या झुंजीसारख्या एंटरटेनमेंटसाठी नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे शहर आज कोयता गॅंग, वाढती गुन्हेगारी, अपघात, कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा, भ्रष्टाचार आणि कर्जबाजारी महापालिका अशा समस्यांनी ग्रासले आहे. या पार्श्वभूमीवर पुणेकरांना दिलासा देण्याऐवजी गेल्या आठ वर्षांत सत्तेत असलेल्या नेत्यांनी नेमके काय केले, याचा हिशोब द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीने केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने भ्रष्टाचाराचा कळस गाठला असून निविदा रक्कम फुगवून कामे लाटली जात असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना मुरलीधर मोहोळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार यादीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मात्र या आरोप-प्रत्यारोपातून पुणेकरांच्या प्रश्नांवर कोणतेही ठोस उत्तर मिळत नसल्याचे आपचे म्हणणे आहे.
या वादात उडी घेत आम आदमी पार्टीने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील चिखलफेक म्हणजे निव्वळ नुरा कुस्ती असल्याचा आरोप केला. पिंपरी-चिंचवडमधील स्थायी समिती अध्यक्षांच्या लाच प्रकरणापासून ते जैन होस्टेल खरेदी प्रकरण आणि मुंढवा जमीन प्रकरणापर्यंत अनेक भ्रष्टाचार प्रकरणांचा पाठपुरावा आम आदमी पार्टीने केल्याचे किर्दत यांनी सांगितले.
सत्तेसाठी एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले नेते निवडणुकीपुरते भांडणाचा देखावा करत असून पुणेकरांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे. आम आदमी पार्टी ही सातत्याने सामान्य माणसाच्या विकासासाठी काम करत असून ट्रिपल इंजिन असलेल्या भाजपच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करत आली आहे. त्यामुळे पुणेकरांसाठी एकमेव सक्षम आणि विश्वासार्ह विरोधी पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी आहे, असा दावा मुकुंद किर्दत यांनी केला.