
पुणे, दि. ३ : सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत पुण्याच्या सर्वांगीण विकासाची शपथ आज भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांनी घेतली. निवडणुकीला सामोरे जाताना जाहीरनामा जनतेसमोर मांडून निवडणूक लढवणारा भाजप हा एकमेव पक्ष असून, आतापर्यंत सादर केलेल्या १४ जाहीरनाम्यांतील प्रत्येक बाब पूर्णत्वास नेणारा भाजपच असल्याचा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला.
समताभूमी येथे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांना वंदन करून पुणे शहर भारतीय जनता पक्षाच्या महानगरपालिका निवडणूक प्रचाराचा अधिकृत शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार हेमंत रासने, आमदार सिद्धार्थ शिरोळे, आमदार भीमराव तापकीर, माजी मंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच भाजपचे सर्व उमेदवार व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी भाजपच्या बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविका मंजुषा नागपुरे आणि नगरसेवक श्रीकांत जगताप यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच सर्व उमेदवारांना पुण्याच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी काम करण्याची शपथ देण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले, सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत महिला शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या कार्यामुळे आज देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपती पदावर महिला विराजमान आहेत. समाजाचा तीव्र विरोध असतानाही सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य अखंड सुरू ठेवले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांना खंबीर साथ दिली. सावित्रीबाईंचे विचार केवळ स्मरणात न ठेवता ते आचरणात आणण्याची गरज आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पुरुषप्रधान संस्कृतीत आज अमूलाग्र बदल होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षांत महिलांसाठी सर्वाधिक योजना राबवण्यात आल्या आहेत. कुटुंब सक्षम करायचे असेल तर महिलांचे सक्षमीकरण आवश्यक असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
दरम्यान, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून पुण्याचा विकास वेगाने सुरू असून हा विकास निवडणुकीच्या माध्यमातून जनतेसमोर मांडणे आवश्यक आहे. पुणेकरांनी नेहमीच भाजपला पाठिंबा दिला असून, सत्तेत असताना केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे. निवडणूक काळात विविध विषय मांडले जातील, मात्र भाजप केवळ विकासाच्या मुद्द्यावरच लक्ष केंद्रित करेल. सत्तेसाठी नव्हे तर विकास आणि संस्कार रुजवण्यासाठी भाजप निवडणूक लढवत आहे, असा ठाम संदेश जनतेपर्यंत पोहोचवायचा आहे, असेही मोहोळ यांनी स्पष्ट केले.