बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, आशा काळे आणि अमर हळदीपूर यांना ‘पिफ्फ’ जीवनगौरव पुरस्कार; मराठी चित्रपट स्पर्धेतील ७ चित्रपटांची घोषणा

पुणे दि. ३  : पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ्फ) २०२६ अंतर्गत यंदाचे प्रतिष्ठित ‘जीवनगौरव पुरस्कार’ ज्येष्ठ अभिनेते बिस्वजित चॅटर्जी, फरीदा जलाल, मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा काळे आणि नामवंत संगीत दिग्दर्शक अमर हळदीपूर यांना जाहीर करण्यात आले आहेत. तसेच यंदाच्या मराठी चित्रपट स्पर्धा विभागातील ७ चित्रपटांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

ही घोषणा पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली. पुणे फिल्म फाउंडेशन, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि दादासाहेब फाळके चित्रनगरी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.

१४ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (PIFF 2026) हा १५ ते २२ जानेवारी २०२६ या कालावधीत पुण्यातील विविध ठिकाणी होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन १५ जानेवारी रोजी सायंकाळी होणार असून, समारोप व पुरस्कार वितरण सोहळा २२ जानेवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे. यंदा सुमारे ३० स्क्रिन्सवर देश-विदेशातील निवडक चित्रपटांचे प्रदर्शन होणार आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी www.piffindia.com
या संकेतस्थळावर सुरू आहे.

मराठी चित्रपट स्पर्धा

यंदाच्या मराठी चित्रपट स्पर्धेत खालील ७ चित्रपटांचा समावेश आहे –

आदिशेष – दिग्दर्शक : रेशम मोरे

तो, ती आणि पुंजी – दिग्दर्शक : मोहित टाकळकर

तिची – दिग्दर्शक : जिजीविषा काळे

जीव – दिग्दर्शक : सविता माणिक जाधव

गोंधळ – दिग्दर्शक : संतोष दावर

गमन – दिग्दर्शक : मनोज नाईकसाळे

वाया – दिग्दर्शक : समीर तिवारी

मराठी सिनेमा टुडे विभाग

मराठी सिनेमा टुडे विभागात –

सोहळा (दिग्दर्शक : संकेत बागवान)

मुक्तामणिपर बॉम्बलवाडी (दिग्दर्शक : परेश मोकाशी)

माया (दिग्दर्शक : आदित्य इंगळे)

दिशा (दिग्दर्शक : निलेश भास्कर नाईक)
या चित्रपटांचा समावेश आहे.

कार्यशाळा व चर्चासत्रे

महोत्सवात विजय तेंडुलकर स्मृती व्याख्यान, फिल्म सिटीवर चर्चासत्र, स्वतंत्र सिनेमा आणि प्रादेशिक सिनेमावर परिसंवाद तसेच स्पर्धा विभागातील मराठी चित्रपट निर्माते-दिग्दर्शक यांच्याशी संवादात्मक सत्रे आयोजित करण्यात आली आहेत.

जीवनगौरव पुरस्कार मानकरी

बिस्वजित चॅटर्जी : बंगाली व हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेता, दिग्दर्शक व गायक

फरीदा जलाल : हिंदी चित्रपट व दूरदर्शन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री

आशा काळे : मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री

अमर हळदीपूर : नामवंत संगीत दिग्दर्शक व वादक

चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button