भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही” – पिंपरी-चिंचवड सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा थेट हल्ला

पुणे, दि. ३  : उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड येथील एका जाहीर सभेत भारतीय जनता पक्षावर (भाजप) अत्यंत आक्रमक शब्दांत टीका केली. भाजपवर आरोप करताना त्यांनी “राक्षसी भूक” असा शब्दप्रयोग केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अजित पवार म्हणाले की, भाजपच्या सत्ताकाळात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचारामुळे पोखरली गेली असून, ती प्रचंड कर्जाच्या खाईत लोटली आहे. विकासाच्या नावाखाली गैरव्यवहार सुरू असून, त्याचे गंभीर परिणाम शहराला भोगावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

महानगरपालिकेत खुलेआम हप्तेखोरी सुरू असल्याचा दावा करत, “याचे ठोस पुरावे माझ्याकडे आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले. भाजप नेत्यांवर टीका करताना पवार म्हणाले, “स्वतःच्या परिवाराला आणि जवळच्या लोकांना मोठे करण्यासाठी भाजप नेत्यांची ही राक्षसी भूक आता मला पाहवत नाही.”

जानेवारी २०२६ मध्ये होऊ घातलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, महायुतीमध्ये असतानाही अजित पवार यांनी भाजपवर केलेल्या या थेट आणि आक्रमक टीकेमुळे राजकीय समीकरणांबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या आरोपांना प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अजित पवारांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. “ही टीका नेमकी कोणावर आहे, हे अजित पवारांनी स्पष्ट करावे,” असे सांगत भाजपने आरोप फेटाळले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Call Now Button