
पुणे, दि. ३ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका करत त्यांना “स्वतःच्या पक्षात आधी इंट्रोस्पेक्ट करावे” असा स्पष्ट सल्ला दिला आहे. पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवारांनी भाजपवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी भाजपच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा तसेच महापालिका कर्जबाजारी केल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर संतप्त प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण म्हणाले की, अजित पवार ज्या पक्षावर टीका करत आहेत, तो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करणारा पक्ष आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे.
“भाजपवर आरोप करण्यापेक्षा अजित पवारांनी त्यांच्या स्वतःच्या पक्षातील कारभार, नेते आणि निर्णयप्रक्रियेचा आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे,” असे चव्हाण यांनी ठणकावून सांगितले. तसेच, “जर भाजपने अजित पवारांवर आरोप-प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली, तर त्यांना राजकीयदृष्ट्या मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल,” असा थेट इशाराही त्यांनी दिला.
१५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकांच्या प्रचारादरम्यान महायुतीतील मित्रपक्षांमध्येच अशा प्रकारचे सार्वजनिक आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील वाढता तणाव आगामी निवडणुकांवर काय परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.