
पुणे, दि. ३ : ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविणे, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रोत्साहन देणे तसेच लोकसहभागातून सक्षम प्रशासन घडविण्याच्या उद्देशाने शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू केले आहे. या अभियानात पुणे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी उल्लेखनीय व आदर्श कामगिरी करत राज्यात वेगळा ठसा उमटविला आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण १ हजार ३८७ ग्रामपंचायतींपैकी शासनाच्या निकषांनुसार २८२ ग्रामपंचायतींनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. या ग्रामपंचायतींनी करवसुली, डिजिटल ग्रामपंचायत, डिजिटल शाळा व अंगणवाड्या, स्वच्छता, पाणीपुरवठा, अभिलेख अद्ययावतीकरण, ई-गव्हर्नन्स, लोकसहभाग तसेच विविध विकासकामांमध्ये लक्षणीय प्रगती साधली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण होऊन “उत्कृष्ट ग्रामपंचायत” ही संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे.
या अभियानाच्या व्यापक प्रचार व प्रसिद्धीसाठी पुणे जिल्ह्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दौंड तालुक्यातील गलांडवाडी, बारामती तालुक्यातील काटेवाडी आणि पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी येथे उद्या दि. ५ जानेवारी २०२६ रोजी विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध मराठी अभिनेते श्री. भाऊ कदम व त्यांची टीम विशेष उपस्थित राहणार असल्याची माहिती पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत गावांच्या सर्वांगीण विकासासाठी व ग्रामपंचायतींची कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने या तिन्ही ग्रामपंचायतींनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेऊनच या ठिकाणी सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमस्थळी संबंधित तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे पदाधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
लोकप्रिय अभिनेते भाऊ कदम आपल्या विनोदी व प्रभावी शैलीतून अभियानाची उद्दिष्टे, लोकसहभागाचे महत्त्व तसेच ग्रामविकासाशी संबंधित विविध बाबी ग्रामस्थांपर्यंत पोहोचविणार आहेत. या उपक्रमामुळे ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग वाढून अभियानास नवी ऊर्जा मिळणार आहे. पारदर्शक प्रशासन, विकासाभिमुख उपक्रम आणि लोकसहभाग सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
तरी तालुक्यातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गजानन पाटील यांनी केले आहे.