
पुणे : अंगावर हिरवे इरकल, कपाळी आडवा गंध, हाती भारतीय संविधान आणि ओठांवर सावित्री–ज्योतींचा जागर करत सावित्रीबाईंच्या वेशभूषेत अवतरलेल्या शेकडो लेकींनी संविधान कट्ट्यावर संविधानाचा जागर केला. डोक्यावर फुले फेटा, अंगात कोट घालून महात्मा फुलेंच्या पेहरावात आलेले आयोजक, फुलेप्रेमी कवी व संविधानदूत विजय वडवेराव यांच्या नेतृत्वाखाली हा ऐतिहासिक जागर पार पडला. सभागृहात जणू सावित्रीबाई फुले व महात्मा जोतिराव फुले साक्षात अवतरल्याचे दृश्य अनुभवायला मिळाले.
भिडेवाडाकार फुलेप्रेमी कवी विजय वडवेराव यांच्या संकल्पनेतून देशातील मुलींची पहिली शाळा भिडेवाडा आंतरराष्ट्रीय काव्यजागर अभियानांतर्गत दुसऱ्या आंतरराष्ट्रीय फुले फेस्टिव्हलचे उद्घाटन मान्यवर कवींच्या अध्यक्षतेखाली झाले. हा चार दिवसीय फेस्टिव्हल ५ जानेवारी २०२६ पर्यंत पुण्यातील नवी पेठेतील एस. एम. जोशी फाउंडेशनच्या सभागृहात रंगणार आहे.
फेस्टिव्हलमध्ये महाराष्ट्रासह देश-विदेशातील सुमारे ८०० कवी, साहित्यिक, विचारवंत व कलाकार सहभागी झाले आहेत. महात्मा फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि फातिमाबी शेख यांच्या वेशभूषेतील कवी-कवयित्रींनी सादर केलेल्या काव्यरचनांनी उपस्थितांची मने जिंकली. सावित्री-ज्योती यांच्यासह आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला.
क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात सुरू केलेल्या देशातील पहिल्या मुलींच्या शाळेचा इतिहास जतन व्हावा, फुले दाम्पत्याच्या कार्यकर्तृत्वाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि हा इतिहास पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावा, या उद्देशाने या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
फेस्टिव्हलदरम्यान देश-विदेशातील कवींचा काव्य महोत्सव, भिडेवाडा विषयावरील मराठी गझल मुशायरा, एकपात्री प्रयोग, शालेय विद्यार्थ्यांच्या नाट्यछटा, एकांकिका, सांगितिक पोवाडे तसेच महिला सक्षमीकरणासाठी लाठीकाठी व दांडपट्टा प्रात्यक्षिक असे विविध कार्यक्रम होणार आहेत. लंडन, ऑस्ट्रेलिया, अबुधाबी यांसह महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, गुजरात, तेलंगणा, दिल्ली, राजस्थान व उत्तरप्रदेश आदी राज्यांतून कवी-कवयित्री सहभागी झाले आहेत.
महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचा त्याग, समर्पण आणि देशाच्या जडणघडणीतील योगदान अमूल्य आहे. ही एक सामाजिक चळवळ असून, फुले विचार पुढील पिढीत रुजवण्यासाठी वर्षभर जिल्हा व राज्यस्तरावर विविध उपक्रम राबवले जातात. स्त्री शिक्षणाचा पाया रोवताना कर्मठ व्यवस्थेच्या विरोधात जाऊन अपमान, शिव्याशाप, चिखलफेक सहन करणाऱ्या फुले दाम्पत्याला भारत रत्न पुरस्कार मिळावा यासाठी अभियान राबवणार असल्याचे विजय वडवेराव यांनी यावेळी सांगितले.