
पुणे, दि. 3: माजी सैनिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या सुरक्षा सेवा पुरवठा कंपनीमार्फत शेवाळवाडी, सोलापूर रोड, पुणे येथे सुरक्षा सहकारी पदासाठी भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाच्या ०२०-४५०५३६१० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.) यांनी केले आहे.
गॅलंट फोर्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रिअल इस्टेट, बांधकाम क्षेत्र, उच्चभ्रू निवासी सोसायट्या, कॉर्पोरेट व माहिती तंत्रज्ञान क्षेत्र, व्यावसायिक संकुले (मॉल्स), हॉस्पिटॅलिटी उद्योग, हॉटेल्स व रिसॉर्ट्स, उत्पादन व लॉजिस्टिक्स, फार्मा उद्योग, रुग्णालये, बँका, कॅश मॅनेजमेंट सेवा, शैक्षणिक संस्था, खासगी बंगले तसेच वैयक्तिक सुरक्षा सेवांमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश व गोवा या राज्यांमध्ये कंपनीची सेवा उपलब्ध आहे.
सुरक्षा सहकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या माजी सैनिकांचे वय ४० ते ५५ वर्षांदरम्यान असावे. निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २४ हजार रुपये वेतन देण्यात येणार असून भविष्य निर्वाह निधीचा (पीएफ) लाभ मिळणार आहे. तसेच बोनस, एलडब्ल्यूडब्ल्यू, एनपीएच व ग्रॅच्युइटीचे लाभ लागू झाल्यास ते अतिरिक्त देण्यात येतील.
कामाची वेळ दररोज ८ तासांची असून महिन्यात २६ ते २७ दिवस कामकाज करावे लागणार आहे. वाजवी शुल्काच्या आधारे निवासाची सुविधाही उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे